रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध ध्वनिसंयोजक राजू बर्वे यांचे २२ फेब्रुवारी रोजी सकाळी निधन झाले. मागील ४ वर्षे ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवार 22 फेब्रुवारी रोजीच त्यांचा वाढदिवसही होता. त्यांच्या निधनाने रत्नागिरीतील सांस्कृतिक क्षेत्रात खूप हळहळ व्यक्त होत आहे.
रत्नागिरीतील ख्यातनाम ध्वनिसंयोजक म्हणून राजू बर्वे यांची ख्याती होती. रत्नागिरीतील पहिली भव्य साऊंड सिस्टीम राजू बर्वे यांची होती. महाराष्ट्रातील अनेक नामवंत गायक कलाकारांच्या मैफिली राजू बर्वे यांच्या साऊंडने रत्नागिरीत गेली ३०-३५ वर्षे सजल्या. त्यांच्या साऊंडमुळे रत्नागिरीकर रसिकांना गायनाचा उत्तम आस्वाद घेता आला.
“खल्वायन” संस्थेची मासिक संगीत सभा त्यांच्या साऊंडमुळे अधिक नादमधुर होत होती. त्यांचे बंधू, रत्नागिरीतील प्रसिद्ध तबलावादक पांडुरंग बर्वे यांच्या “स्वरलहरी” ग्रुपला त्यांच्या साऊंडमुळे पूर्णत्व मिळत होते. राजू बर्वे यांच्या साऊंडमुळे रत्नागिरीत अनेक नवोदित गायक, वादक कलावंत घडले. त्यांच्या निधनाने रत्नागिरीतील सांगितिक क्षेत्र सुनेसुने झाले आहे.