रत्नागिरी:- ‘प्रशासन सहजासहजी कोणाला जुमानत नाही. त्यासाठी अजित पवार यांनी जशी आपल्या कामातून प्रशासनात आदरयुक्त भीती निर्माण केली, तशीच भूमिका घ्यावी लागेल,’ असा सल्ला देत चंद्रकांत पाटील यांनी सुनेत्रा पवार यांना मार्गदर्शन केले. रत्नागिरी दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा सल्ला नसून प्रशासकीय कामकाजाचे विश्लेषण असल्याचे स्पष्ट केले.
मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपवर केलेल्या टीकेला उत्तर देताना पाटील यांनी सांगली महापालिकेतील राजकीय घडामोडींचा संदर्भ दिला. “राजकारण हे संधीशी जोडलेले असते. सांगली महापालिकेत शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याची स्वतंत्र यादी होती, त्यामुळे युती होऊ शकली नाही. उलट भाजपचे उमेदवार पाडले गेले. अजित दादांनी 16 नगरसेवक दिल्याने आम्ही त्यांना उपमहापौरपद दिले; दोन नगरसेवक असलेल्यांना काय देणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “कोणी कोणाला फसवले, याचा दहा वर्षांचा इतिहास पाहिला तर प्रत्येकाने कोणाला तरी फसवले आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
रोहित पवार यांनी केलेल्या घातपाताच्या आरोपांवर भाष्य करताना पाटील म्हणाले, ‘लोकशाहीत आरोप करण्याचे स्वातंत्र्य आहे. रोहित पवार कुटुंबातील सदस्य असल्याने त्यांना तसे वाटू शकते; मात्र माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा त्यांनी त्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन सत्य शोधावे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईचे दिलेले आदेश योग्य असल्याचे सांगत पाटील म्हणाले, ‘पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील बहुतांश फेरीवाले बांगलादेशी असल्याचे सांगितले जाते. अशा प्रकरणांमध्ये कारवाईनंतर बाहेर पाठवण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे; ती सुलभ करणे आवश्यक आहे. गेल्या तीन महिन्यांपासून निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने दोन दिवस पावस येथे विश्रांतीसाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षण व जरांगे पाटील आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन फसलेले नसल्याचे सांगत पाटील म्हणाले, “मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटनुसार अनेक कुणबी नोंदी सापडल्या आहेत. एका नोंदीमुळे 300 प्रमाणपत्रे तयार होऊ शकतात. मात्र या सर्व कायदेशीर बाबी आहेत. नोंदी वैयक्तिक स्तरावर कशा लागू करायच्या, याचा निर्णय अद्याप बाकी आहे.









