प्रशासनाकडून २४ तासात नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईचे वाटप

वीज पडून मृत्यू, वारसाला ४ लाख ; ५ जखमींना प्रत्येकी ५४००

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील मौजे मुर्तवडे येथील वीज पडून झालेल्या दुर्घटनेत सुशील शिवराम पवार यांचा मृत्यू झाला होता. २४ तासांच्या आत प्रशासनाकडून वारस श्रेया पवार यांना ४ लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. तसेच ५ जखमींना प्रत्येकी ५४०० रुपयांची मदत देण्यात आली.

मौजे मुर्तवडे येथे दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वीज पडून सुशील शिवराम पवार (रा. मुर्तवडे) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत काहीजण किरकोळ जखमी झाले होते. या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ प्रतिसाद देत नैसर्गिक आपत्ती मदत निधीतून मृत व्यक्तीच्या वारस श्रेया सुशिल पवार यांना चार लाख रुपये आर्थिक मदत केवळ 24 तासांतच देण्यात आली.

ही मदत उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या हस्ते तहसिलदार प्रविण लोकरे, मंडळ अधिकारी वहाळ तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.

वीज पडून किरकोळ जखमी झालेल्या उत्तम भिवा पवार , उर्मिला उत्तम पवार, संदीप लक्ष्मण पवार, सुजाता रामदास पवार, रोशन रामदास पवार या प्रत्येकाला ५ हजार ४०० रुपयांची मदत नैसर्गिक आपत्तीच्या तरतुदीनुसार नुकसान भरपाई देण्यात आली. स्थानिक प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करून पीडित कुटुंबीयांना तातडीची मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.