प्रशासकीय राजवटीत रनपवर 26 कोटी 28 लाखांचा बोजा

न. प. फंडाचा बेसुमार वापर, रनपची आर्थिक स्थिती गंभीर

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेवर सध्या 38 कोटी 28 लाखांचा बोजा असल्याची माहिती शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे एकूण बोजा पैकी प्रशासकीय कालावधीच्या चार वर्षात तब्बल 26 कोटी 28 लाखांचा बोजा रत्नागिरी नगर परिषदेवर पडला आहे. न. प. फंडाचा झालेला वारेमाप वापर यामुळे नगर परिषद कर्जाच्या खाईत असल्याची बाब शुक्रवारी झालेल्या सभेत समोर आली.

सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी नगर परिषदेची आर्थिक स्थिती सभागृहासमोर मांडली. नगर परिषदेवर कोट्यवधीचे कर्ज असल्याने आतापासूनच काटकसर करताना काही कठोर निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये खर्चाचा ताळमेळ जमवताना कर्मचारी कपात देखील करण्यात येणार आहे. 1 फेब्रुवारीपासून प्रत्येक कर्मचाऱ्याने वेळेवरच कार्यालयात हजर असणे बंधनकारक असणार आहे. सीईओ वगळता अन्य सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक असणार आहे. हालचल रजिस्टर आवश्यक असेल. रजा घेताना विभागप्रमुखाचा शेरा सीईओ आणि नगराध्यक्ष यांची सही हवी. तसेच कामाची नोंदवही यात दिवसभराच्या कामाची नोंद ठेवणे कर्मचाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.

यावेळी नगर परिषदेवर असलेल्या कर्जाची माहिती सभागृहाला अवगत करून देताना रनपवर 2021 पासून 36 कोटी 28 लाख कर्ज असल्याची माहिती अकाउंट विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 2021 मध्ये रनपवर 10 कोटींचे कर्ज होते. पुढील चार वर्षात कर्जाचा आकडा 26 कोटी 38 लाखांनी वाढला. कर्जाच्या रकमेतील सर्वाधिक देणं कंत्राटदारांचे आहे. रनप कंत्राटदारांचे 26 कोटी 62 लाख देणे आहे. महावितरणचे 4 कोटी 63 लाख, शासकीय तंत्रनिकेतन यांचे 63 लाख 51 हजार, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांचे 62 लाख, निवृत्त कर्मचारी यांचे 1 कोटी 19 लाख, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे 2 कोटी 81 लाख आणि अन्य रक्कम मिळून नगर परिषदेवर एकूण 36 कोटी 28 लाखांचे कर्ज असल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली.

2021 मध्ये नगर परिषदेचं बजेट 150 कोटी होत. 2025 मध्ये हे बजेट वाढून 300 कोटी झाले आहे. लोक वर्गणीच्या कामामुळे नगर परिषदेवरील कर्ज वाढल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र बजेटच्या बैठकीत झालेल्या चुका लक्षात आणून देऊ असा इशाराच यावेळी उपस्थित नगरसेवकांनी दिला.