प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीकडून खासगी वाहतुकीसोबत हातमिळवणी

रत्नागिरी:- एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी एस टी कामगारांनी संप पुकारलेला असतानाच शासनाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये असे कारण देत खासगी वाहतुकीला रत्नागिरीतील एस टी आगारातून प्रवासी वाहतुक करण्यास मुभा देण्यात आली आहे.

गेले काही दिवस केवळ आश्वासनांवर समाधान मानणाऱ्या एस टी कामगारांनाही आता आक्रमक भूमिका घेतली आहे. महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी राज्यभर कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे सोमवारपासून संपूर्ण राज्यातील बस वाहतूक जवळपास बंद आहे. आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे तर यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल होत आहे.या पार्श्वभूमीवर खासगी वाहतुकीला आगारातून वाहतूक करण्याची परवानगी देणारे परिपत्रक जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी जारी केले आहे. जिल्हाधिकारी , रत्नागिरी यांनी आपत्ती व्यवस्थापन नियम २००५ चे कलम ३० अंतर्गत हे परिपत्रक जारी केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या ० ९ एस . टी . डेपोमध्ये प्रवाशांची वाहतुक करण्यासाठी तसेच प्रवाशांची कोणत्याही परिस्थितीत गैरसोय होवु नये या कारणास्तव परिवहन विभाग , राज्य मार्ग परिवहन महामंडळ व पोलीस विभाग यांचे समन्वयाने प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता महाराष्ट्र शासनाने सर्व खाजगी बसेस , स्कुल बसेस , नीच्या मालकीच्या बसेस व मालवाहु वाहने यांना प्रवासी वाहतुक करण्यास मान्यता दिली आहे . सुट ही दि . ०८.११.२०२१ च्या मध्यरात्रीपासून प्रस्तावित संप ज्यावेळी मागे घेतला जाईल त्यावेळी सदर अधिसुचना रद्द समजण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत .

याकामी प्रवाशांसाठी वाहतुक व्यवस्था सुरळीतपणे उपलब्ध होण्यासाठी परिवहन विभाग , पोलीस विभाग , एस . टी . महामंडळाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आली आहे . त्याअनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील ९ बस डेपो मॅनेजर यांचेशी संपर्क साधून त्यांच्या आवश्यकतेनुसार खाजगी बसेस , कंपनी बसेस , स्कुल बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत . या आपत्कालीन कालावधीमध्ये वाहनधारकांकडून अवाजवी भाडे अथवा प्रवाशांची अडवणुक केली जाणार नाही यावर देखील संबंधित अधिकाऱ्यांमार्फत नियंत्रण ठेवण्यात येत आहे . असेही या पत्रकात म्हटले आहे.