रत्नागिरीतील अध्यक्षपद व उर्वरित प्रभागांचे मतदान नियोजित वेळेत होणार: जिल्हाधिकारी
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान, प्रभाग क्रमांक १० मधील सदस्य (नगरसेवक) पदाच्या निवडणुकीला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. या प्रभागातील नामनिर्देशनपत्रांच्या छाननीसंबंधी दाखल झालेल्या अपिलाचा निकाल २२ नोव्हेंबरनंतर लागल्यामुळे, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग क्र. १० मधील सदस्य पदाकरिता जाहीर करण्यात आलेली निवडणूक स्थगित करण्यात येत आहे. याबाबतचा सुधारित निवडणूक कार्यक्रम ४ डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल.
संबंधित प्रभागातील मतदार आणि उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जिंदल यांनी केले आहे.
रत्नागिरी नगर परिषदेत नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध प्रभाग १० साठी दोन अपिले दाखल झाली होती. या अपिलांचा निकाल जिल्हा न्यायालयाने २५ नोव्हेंबर रोजी जाहीर केला.
राज्य निवडणूक आयोगाच्या (दि. २९ नोव्हेंबर २०२५) आदेशानुसार, ज्या जागांसाठी अपिलाचा निकाल २२ नोव्हेंबरनंतर लागला आहे, त्या जागांच्या निवडणुका ४ नोव्हेंबरच्या मूळ कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक १० मधील अध्यक्ष (नगराध्यक्ष) पदाकरिताचे मतदान आणि उर्वरित सर्व प्रभागांतील मतदान नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, यात कोणताही बदल नाही.
केवळ प्रभाग १० मधील सदस्य पदाची निवडणूक तात्पुरती स्थगित झाली आहे.









