प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत 13 कोटी 74 लाखांचे वाटप 

रत्नागिरी:- प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३२ हजार २४७ मातांच्या बँक खात्यात १३ कोटी ७४  लाख ७७ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबवण्यास आरंभ केला. यामध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के व राज्याचा ४० टक्के सहभाग आहे. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार देणे, मातामृत्यू व बालमृत्यू दरात नियंत्रण ठेवणे, प्रसुतीपश्चात महिलेला बुडीत मजूरी मिळावी यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत ५ हजार रुपये रक्कम दिली जाते. रत्नागिरी जिल्हयात आतापर्यंत ३२ हजार २४७ मातांच्या बँक खात्यात १३ कोटी ७४ लाख ७७ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. कोविड काळातही मातांकडून नोंदणीला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली. जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. राजन शेळके यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र मातांना आवाहन केले आहे.