प्रधानमंत्री आवासची ६६ घरकुल पूर्ण

आठ शहरांतील स्थिती ; ३,९३१ घरकुले उद्दिष्ट

रत्नागिरी:- जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती यांना प्रधानमंत्री आवास योजनेची ३,९३१ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले आहे. त्यापैकी केवळ ६६ घरकुले पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या योजनेच्या घरकुलांचे काम एक टक्काही पूर्ण झालेले नाही.

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागात २०१५ पासून राबविण्यात येत आहे. यामध्ये सन २०२२पर्यंत ज्यांना घरे नाहीत, त्यांना घरे उपलब्ध करून देण्याचा उद्देश सरकारने डोळ्यासमोर ठेवला आहे. शहरातील जे नागरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, अशा वर्गासाठी घराचा आकार ३० चौरस मीटर चटई क्षेत्र करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. ही याेजना प्रामुख्याने झोपडपट्टी जमीन असणाऱ्यासाठी असून, दुर्लक्षित घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री यांच्या नावाने योजना सुरू करण्यात आली. मात्र, कोणत्याही मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने, या योजनेचा जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोजवारा उडाला आहे. एका बाजुला सरकारकडून चांगल्या योजना आणल्या जात असल्या तरी त्या राबवताना होत असलेल्या दुर्लक्षामुळे लाभार्थी त्यापासून वंचित राहत आहेत. त्याबाबत ओरड होऊनही पुरेसे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात या योजनेचे एक टक्काही काम झालेले नाही. दरम्यान, काही लाभार्थ्यांचे अपूर्ण प्रस्ताव, उशिरा आलेले प्रस्ताव अशा विविध कारणांमुळे या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही, असे कारण प्रशासनाकडून पुढे केले जात आहे.