प्रत्येक नेत्याचा मान राखत महायुती भगवा फडकवणार

पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती

रत्नागिरी:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीचे धोरण निश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती आहे. ही समिती जो निर्णय घेईल तो अंमलात येणारा आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेते युती संदर्भात काही बोलले तरी त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे समन्वय समितीतील शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची महायुती आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे काम नेते निवडणूक आणि इतर प्रशासकीय कामकाजाबाबत टीका करत असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पालकमंत्री उदय सामंत यांनी समन्वय समितीसंदर्भात माहिती दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे धोरण ठरवण्यासाठी स्थापन झालेल्या समन्वय समितीत उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा सहभाग आहे. सोबत भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश नेते खा.सुनिल तटकरे यांचा सहभाग आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोण काय बोलतो याकडे लक्ष देण्याची गरज नाही. समिती जे धोरण ठरवेल ते अंतीम असणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. महायुतीतील प्रत्येकाचा मान, सन्मान राखून निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. इतकेच नव्हे तर संपूर्ण राज्यात महायुतीचा भगवा फडकवला जाईल, असा विश्वासही पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.