प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन हेच जल जीवन मिशन: सीईओ जाखड

रत्नागिरी:- जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना घरगुती कार्यान्वीत नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान जिल्ह्यात राबविण्याबाबत येत आहे. गाव कृती आराखडयात प्रत्येक कुटुंबाना समाविष्ट करुन त्यांना नळ जोडणी देण्यात यावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले. हे आराखडे १५ ऑगस्टपूर्वी तयार करा अशा सुचना त्यांनी दिल्या.

 ग्रामीण भागात प्रत्येक पात्र कुटुंबाला शुध्द पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्टये आहे. जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुध्द व पुरेसा आणि शाश्वत पाणी पुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करुन देणे हे उद्दिष्ट असून, यामध्ये योजना पूर्ण करणे एवढाच उद्देश नसून  कार्यक्षम पाणी पुरवठयाची एक शाश्वत सेवा उपलब्ध करुन देणे आहे.

शासनाच्या जल जीवन मिशन योजने अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला शुध्द पाणी पुरवठा मिळणेसाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या माध्यमातून गाव कृती आराखडा पंधरवडा सुरु आहे. सदर अभियान कोविडच्या पार्श्वभूमीवर  कोबो कलेक्ट हया डिजीटल माध्यमाचा उपयोग करुन जिल्हा, तालुका व गांव पातळीवर करणेत येणार आहे. तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशिक्षित मनुष्यबळाच्या समन्वयाने सदरची गांव कृती आराखडयाची प्रक्रिया राबविणेत येत आहे.

गावाचा गाव कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा कक्षाच्यावतीने पहिल्या टप्प्यात मंडणगड, दापेाली, राजापूर,  दुस-या टप्प्यात, संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी व तिस-या टप्प्यात, चिपळूण, खेड, गुहागर या तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षा, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे दोन प्रतिनिधी यांना ऑलाईन पध्दतीने प्रशिक्षण देण्यात आले.