रत्नागिरी:- प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात अनेक आंबा बागायतदारांनी केलेल्या मेहनतीचे फळ मिळू लागले आहे. फेब्रुवारी महिन्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून दिवसाला हजारांहून अधिक पेट्या हापूसच्या वाशी मार्केटला रवाना होत आहेत. गुरुवारी (ता. २४) पंधराशे पेट्या पोचल्या आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्याचा वाटा २५ टक्के इतका आहे. उत्पादन कमी असल्याने यंदा दरही चढे असल्याचे वाशी बाजारातील व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.
अवकाळी पाऊस आणि प्रमाणापेक्षा अधिक कालावधीपर्यंत टिकलेली थंडी यामुळे आंबा हंगाम अडचणीत आला आहे. सुरवातीला उत्पादन कमी राहणार असल्याचे संकेत आधीच मिळालेले आहेत. पहिल्या टप्प्यातील बहुतांश मोहोर आणि फळं गळून गेली. त्यामधून वाचलेल्या मोहोरातून उत्पादन मिळवण्यासाठी बागायतदारांनी औषध फवारण्यांचा पर्याय अवलंबला. त्यामुळे पहिल्या टप्प्यातून किमान उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये रत्नागिरीतून मोठ्या प्रमाणात आंबा वाशी बाजारपेठेत पाठवला जात आहे. २२ फेब्रुवारीला १३५० पेटी आंबा गेला होता. २४ ला १५०० पेट्या गेल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक आंबा सिंधुदुर्गमधून जात आहे. वेंगुर्ला, देवगड या तालुक्यांतील या पेट्या आहेत. गेली दोन वर्षे कोरोनामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातून साधारणपणे तीनशे पेट्या असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गुणवत्तापूर्ण फळाच्या पाच डझनच्या पेटीला सात हजार रुपये तर बारीक फळाला पेटीला दोन हजार रुपयेही दर मिळत आहे.