प्रजासत्ताक दिनी पर्ससीन मच्छीमारांकडून एकाचवेळी तीन ठिकाणी आंदोलने

रत्नागिरी:- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 तील सुधारणेच्या नियमाला विरोध करण्यासाठी पर्ससीन नेट मच्छिमारांनी प्रजासत्ताक दिनी एकाच वेळी तीन ठिकाणी आंदोलने केली. मिरकरवाडा बंदरातील सर्व नौकांवर काळे झेंडे लावण्यात आले होते. पारंपरिक मच्छिमारांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काळ्या फिती लावून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्याचवेळी पर्ससीन नेट मच्छिमारांचे साखळी उपोषणही सुरूच आहे.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमनात सुधारणा करण्यात आली. या सुधारित कायद्यामुळे पर्ससीन नेट मासेमारी करणार्‍यांवर अन्याय झाला आहे. 1 जानेवारीपासून या मच्छिमार नौकांना केंद्राच्या अधिकार क्षेत्रातील समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाण्यास राज्याच्या अधिकार क्षेत्रातील समुद्रातून मार्गिका दिली जात नाही. त्याचबरोबर केंद्राच्या अखत्यारितील समुद्रात मासेमारी करून येणार्‍या पर्ससीन नौकांना राज्याच्या बंदरांवर मासळी उतरवण्यास मज्जाव आहे. इतकेच नव्हे तर मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांनीच कारवाई करायची आणि याचा खटलाही त्यांनीच चालवायचा. या सुधारणांना मच्छिमारांचा तीव्र विरोध आहे.

सुधारित कायद्याला विरोध करण्यासाठी आणि राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी पर्ससीन नेट मच्छिमारांनी एकाच वेळी तीन ठिकाणी आंदोलने केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काळ्या फिती लावून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मिरकरवाडा बंदरातील सर्वच नौकांवर काळे झेंडे लावून सुधारित कायद्याला विरोध आणि राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. मोठ्या संख्येने मच्छिमारांनी हातात काळे झेंडे फडकावत संपूर्ण मिरकरवाडा बंदरावर रॅली काढून पारंपरिक मच्छिमारांच्या विरोधात घोषणा दिल्या.एकीकडे एकाच विषयासाठी ही दोन आंदोलने होत असताना 3 जानेवारीपासून सुरू झालेले साखळी उपोषणही सुरूच होते. मिरकरवाडा बंदरावरील रॅलीवेळी ‘समुद्र आमच्या हक्‍काचा, नाही कुणाच्या बापाचा’, कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’ अशा घोषणा दुमदुमल्या.