रत्नागिरी:- प्रजासत्ताक दिनी गुरुवारी (ता. २६) २९ आंदोलनांची निवेदने प्राप्त झाली आहेत. जिल्हा प्रशासना व्यतिरीक्त इतर कार्यालयात अथवा संबंधित तालुक्यामध्ये ६५ आंदोलने होणार आहेत. यामध्ये उपोषण, लाक्षणिक उपोषण, धरणे आंदोलनासह बेमुदत उपोषणासह आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरी केली मात्र आजही सामान्य जनतेला आपल्या मागण्या आणि अडिअडचणींसाठी आंदोलनांचा मार्ग अवलंबावा लागत आहे. प्रशासनाकडुन किंवा संबंधित खात्याकडुन अनेक वेळा तगादा लावुनही काही पश्न सोडविले जात नाहीत. या प्रश्नांसाठी आपल्या हक्कासाठी आजही सामान्य माणसाला लढा द्यावा लागत आहे. उद्या होणा-या प्रजासत्ताक दिनानिमित्त अशा अनेकांनी विविध आंदोलने करण्याचा इशारा पशासनाला दिला आहे. २४ जानेवारी २०२३ पर्यंत जिल्हा प्रशासनाकडे २९ आणि इतर काही शासकीय कार्यालयांमध्ये ६५ निवेदने प्राप्त झाली आहेत. या निवेदनांपैकी ८ व्यक्तींनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तर ३० जणांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ आंदोलकांनी प्रशासकीय कामकाजासंदर्भात उपोषणाचा इशारा दिला आहे. तर ५ जणांनी धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. ३ जणांनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. यापैकी सिद्दाम कृष्णा बागळे रहाणार सांगली यांनी ट्रक व्यवसायात येणा-या अडचणीसाठी उपपादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी येथे थाळी नाद आणि ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.