रत्नागिरी:- रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 26 एप्रिलपासून आपण जि.प. गटनिहाय मेळावे घेणार असून सिंधुदूर्गमध्येही समन्वय साधणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठामताधिक्क्याने विजय मिळेल त्यात, रत्नागिरी विधानसभेचा वाटा पहिल्या नंबरचा असेल असेही राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते ना.उदय सामंत यांनी सांगितले. आगामी विधानसभेमध्ये कोकणात धनुष्यबाण डॅमेज होणार नाही याची दक्षता भाजपा घेईल, असेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते. रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या दृष्टीने रत्नागिरी विधानसभेचा आपण आढावा घेतला. पदाधिकार्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील तीनही विधानसभेत किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची प्रचार काम करीत आहे. रत्नागिरी शहर व ग्रामीण भागात प्रत्येक घराघरात आगामी काही दिवसात कार्यकर्ते पोहचून महायुतीची कमळ निशाणी पोहचवणार आहेत. लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शिवसेनेतर्फे किरण सामंत, माजी खास. निलेश राणे, आ. नितेश राणे यांच्यामार्गदर्शनाखाली कार्यकर्ते काम करीत आहेत.
आपण सध्या राज्यातील अन्य भागात प्रचाराला असून मंगळवारी वेळातवेळ काढून आढावा घेतला आहे. रत्नागिरी विधानसभेअंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद गटात 26 एप्रिलपासून पुढील काही दिवस आपण मेळावे घेणार आहोत. या मतदार संघासाठी वेळ देऊन महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना जास्तीतजास्त मताधिक्क्य मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. प्रत्येक जि.प. गटात किमान साडेतीन ते चार हजार मतदारांचा मेळावा होईल त्याचे नियोजनही करण्यात येत असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
लोकसभा व विधानसभेबाबत काही गल्लत होणार नाही. विधानसभेला आपण धनुष्यबाणाचेच उमेदवार असणार, रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य विधानसभेलाही धनुष्यबाणाचा उमेदवार असेल असेही त्यांनी सांगितले. लोकसभेला जरी कमळ चिन्ह लोकांसमोर महायुतीकडून जाणार असले तरी शिवसैनिक विधानसभेला पुन्हा धनुष्यबाण पोहचवतील, शिवसैनिकांना टी-20 खेळण्याची सवय आहे. त्यामुळे कमी वेळात लोकापर्यत धनुष्यबाण असेल. धनुष्यबाण डॅमेज होणार नाही याची दक्षता भाजपा देखिल घेईल असेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.
उमेदवारी मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरु होता. मात्र आता नारायण राणे हे उमेदवार असून महायुतीचे काम जोमाने सुरु असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख राहूल पंडित, तालुकाप्रमुख महेश म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, युवा शहरप्रमुख अभिजीत दुड्येे आदी उपस्थित होते.









