रत्नागिरी:- शासनाकडून शाळांना देण्यात येणार्या पोषण आहारात बदल करण्यात आला आहे. शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार मुलांना आता सकस आहार मिळणार आहे. एकीकडे ही मुलांसाठी समाधानाची बाब असली तरी दुसरीकडे आहार शिजविणार्या बचतगटांच्या मानधनात मात्र कोणतीही वाढ झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे मानधनवाढीबाबत आकस का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. या योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रोटीनयुक्त व इयत्ता 6 वी ते 8 वी या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रोटीनयुक्त आहार देण्यात येतो.
शैक्षणिक वर्ष सन 2024- 25 मध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याकरीता पुरवठादार म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्युरमेंट प्रोसेसिंग अँड रिटेलिंग को.-ऑप. ऑफ इंडिया यांची नियुक्ती करुन योजनेच्या कार्यान्वयासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. 15 प्रकारच्या पाककृती स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. या आहारामध्ये तांदळाची खीर, नाचणी सत्व व मोड असलेले कडधान्य, अंडी, सोयाबीन वडी, गुळ- साखर, दूध पावडर आदींचा समावेश असून लागणारा आहार खर्चाव्यतिरिक्त अधिकचा निधी राज्यस्तरावरुन पुरवण्यात येणार आहे.
नाचणी सत्वासाठी आवश्यक नाचणीचा पुरवठा भारतीय अन्न महामंडळाकडून करण्यात येणार आहे. अंडी न खाणार्या विद्यार्थ्यांना त्या दिवशी शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादित केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पोषण आहारात सकस घटक वाढलेले असले तरी आहार शिजविणार्या बचतगटांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. सध्या बचतगटांना तुटपुंजे दीड हजार मानधन दिले जाते. आता काम वाढणार असल्याने व यामध्ये दिवस जाणार असल्याने त्यांच्याही मानधनात वाढ करणे क्रमप्राप्त होते. मात्र, अद्याप मानधनात वाढ झालेली नसल्याने बचतगटातील महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.