पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या बचत गट, संस्थेची निवड करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला

रत्नागिरी:-  शहरी भागातील शाळेत विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे तयार आहाराचा पुरवठा करण्यासाठी महिला बचत गट, संस्थांची निवड करण्याचे अधिकार यापुढे संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळांना न जुमानणार्‍या काही बचत गट, संस्थांच्या मनमानीला चाप बसला आहे.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेंतर्गत शहरातील शाळांमध्ये धान्य साठविण्यास तसेच स्वयंपाकगृहासाठी जागा उपलब्ध नाही, अशा शाळांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे आहार पुरवठा करण्यात येतो. त्यासाठी महापालिका व नगरपरिषद शिक्षण मंडळ प्रशासनामार्फत अर्ज मागवून महिला बचत गट, संस्थांची निवड करण्यात आली होती. मात्र आहार पुरवठादार बचतगट संस्थांबाबत शासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे शासनाने सुधारित निर्णय घेतला आहे.

नागरी भागात शाळेतील विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे तयार आहाराचा पुरवठा करण्यासाठी महिला बचत गट, संस्थांची निवड करण्याचे अधिकार यापुढे संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात येत असल्याचा शासन निर्णय 14 ऑक्टोबर रोजी काढण्यात आला आहे. प्रति दिन प्रति विद्यार्थी निर्धारित केलेला तांदूळ व आहार खर्चाची रक्कम आता शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीस देण्यास येईल. नियुक्त बचत गट, संस्था यांनी शासनाने निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देणे आवश्यक राहील, असे शासन निर्णयात म्हटले आहे.