पोलीस विभागाकडून ‘ई-ज्योती’ सुविधा

रत्नागिरी: कर्तव्य करताना कुठलाही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कोणतीही त्रुटी राहू नये यादृष्टीने त्यांना पूर्णत: प्रशिक्षित करण्यासाठी पोलीस विभागाकडून ‘ई-ज्योती’ या नावाने ई-लर्निंग सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे या माध्यमातून सर्व पोलिसांना घरबसल्या किंवा ड्युटी करताना याचा फायदा होणार आहे.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना अतिशय खबरदारीने वागावे लागते. यासाठी काही कौशल्य आत्मसात करावी लागतात. अनवधानाने क्षुल्लक चूक झाली तरीही तपासात अनेक अडचणी येतात व गुन्हेगाराचा शोध घेताना अडचण होऊ शकते. त्यामुळे पोलिसांकडून तपासदरम्यान कुठलीही चूक न होता कशा पद्धतीने एखादे प्रकरण हाताळावे यासाठी ‘ई-ज्योती’ याद्वारे मिळणाऱ्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा फायदा पोलिसांना मिळणार आहे.

नव्याने नियुक्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाही काम करताना कशा पद्धतीने खबरदारी घ्यावी. गुन्ह्याची उकल कशी करावी यासाठीही ई-ज्योती ऑनलाईन प्रशिक्षणाचा फायदा होणार आहे.

जिल्हाभर ‘ई-ज्योती’ या ऑनलाईन प्रशिक्षणाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाही हे कुठल्याही क्षणी ऑनलाईन प्रशिक्षण घेता येते. त्याचबरोबर घरी असतानाही या ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ होऊ शकतो. सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यादृष्टीने पोलीस अधिक कार्यक्षमतेने कार्यरत व्हावा या उद्देशाने ‘ई-ज्योती’ या ऑनलाईन प्रशिक्षणाची संकल्पना आहे. यासाठी जिल्ह्यात ५ नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून ते या ऑनलाईन प्रशिक्षणावर लक्ष ठेवून असतात. या प्रशिक्षणामुळे पोलीस कर्मचाऱ्याला या क्षेत्रातील अधिक ज्ञान मिळण्यास मदत होत आहे.