रत्नागिरी:- पोलीस दलातील शिपाई पदासाठी पदभरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. यात बॅण्डस्मनच्या अवघ्या तीन जागा आहेत. या तीन जागांसाठी तब्बल 5 हजार 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. म्हणजे एका जागेसाठी पावणेदोन हजार उमेदवारांमध्ये रस्सीखेच होईल.
जिल्हा पोलिस दलात बॅण्डस्मन हे पद देखील कार्यरत आहे. शासकीय कार्यक्रम यामध्ये प्रामुख्याने प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन यावेळी या बॅण्डस्मनकडे मोठ्या आदराने पाहिले जाते. या शासकीय कार्यक्रमात बॅण्डस्मननी वाजवलेली धून कानी पडताच अनेकांची छाती गर्वाने फुलते.
जिल्हा पोलिस दलात सध्या शिपाई पदासाठी पदभरती सुरू आहे. यात बॅण्ड पथकातील रिक्त असलेल्या केवळ तीन जागा भरल्या जाणार आहेत. या तीन जागांसाठी तब्बल 5 हजार 5 अर्ज आले आहेत. जाणकारांच्या मते इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज येण्याचे मुख्य कारण म्हणजे कोरोनाने वाढत चाललेली बेकारी. 3 जागांसाठी 5 हजार अर्ज आल्याने आता कौशल्याचा कस लागणार हे निश्चित आहे. यात तज्ञ व्यक्तींसमोर परीक्षा द्यावी लागणार असल्याने सर्वोत्तम उमेदवाराचीच निवड होणार आहे.