पोलिसाला धक्काबुक्की प्रकरणी तिघा कार्यकर्त्यांवर गुन्हा

संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ येथे रविवारी झालेल्या डंपर आणि खासगी बसच्या भीषण अपघातानंतर तीन नागरिकांविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपण जखमींना मदत करत होतो, असा दावा गुन्हा दाखल झालेल्या तिघांनी केला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक संतोष थेराडे, अरविंद जाधव आणि रामचंद्र हरेकर हे अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना मदत करत होते; मात्र, याचवेळी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस कर्मचारी अनिकेत चव्हाण यानी या तिघांनी आपल्याला धक्कबुक्की आणि शिवीगाळ केली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ येथे बस आणि डंपरमध्ये अपघात झाल्यानंतर वाहने जाण्यासाठी पुरेशी जागा असतानाही महामार्गावरील वाहतूक सुमारे पावणेदोन तास रोखून धरण्यात आली होती. यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. राष्ट्रीय महामार्गावर घडलेला अपघात आणि त्यानंतर रोखून धरलेली वाहने यांचा परस्परसंबंध काय, असा सवालही वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी उपस्थित केला.

तसेच त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करत संगमेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना थेराडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अपघातानंतर आम्ही चार तास वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होतो. जखमींना मदत करत होतो. महामार्गावरील खड्यांविषयी आवाज उठवला; पण आता आमच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत. असेच चालणार असेल तर कोणीही मदतीस पुढे येणार नाही, असे त्यांनी म्हटले. स्थानिक नागरिकांमध्येही या घटनेमुळे संतापाची लाट पसरली असून, मदत करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.