चिपळूण:- चिपळूणात पुराचा हाहाकार उडालेला असतानाच मुंबई-गोवा महामार्गाजवळ पेढे-कुंभारवाडी येथील चार घरांवर दरड कोसळल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामध्ये एका कुटूंबातील दोन महिलांसह दोन वर्षांचा मुलगा गाडला गेला आहे. कोसळलेली दरड काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले आहे.
सलग पावसामुळे डोंगरातील झरे वेगाने प्रवाहीत झाले आहेत. माती ओली झाल्यामुळे भुस्खलनाचे प्रकार वाढत आहेत. चिपळूण तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पेढे कुंभारवाडी येथेही मुंबई-गोवा महामार्गानजीक दरड कोसळली. यामध्ये कुंभारवाडीतील चार घरे जमीनदोस्त झाली आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण गावात हाहाकार उडाला आहे. डोंगरातील माती, दगड खाली येत असल्याचे लक्षात आल्यानंत तिन कुटूंबातील लोकांनी घराबाहेर धाव घेतल्यामुळे ते सुरक्षित राहीले होते; परंतु एका कुटूंबातील दोन महिलांसह एक मुलगा गाडला गेला. मृत पावलेल्या अर्चना हरिश्चंद्र मांडवकर (52) त्यांच्या सून आरोही अविनाश मांडवकर (25) आणि नातू आरूष अविनाश मांडवकर (2) यांचा समावेश आहे. सायंकाळी उशिरापर्यंत आरुषचा मृतदेह सापडलेला नव्हता. मोठे दगड घरावर पडल्यामुळे पूर्णतः नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे मांडवकर कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा प्रकार समजल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून तत्काळ मदतकार्य सुरु करण्यात आले. जेसीबीच्या साह्याने घरावर पडलेली माती, दगड काढण्याचे काम सुरु करण्यात आले. मुसळधार पावसाचा जोर कायम असल्यामुळे शोध कार्यात अडथळा येत होता. ही माहिती मिळाल्यानंतर शौकत मुकादम, विलास महाडिक, विश्वास सुर्वे, अभय सुहस्त्रबुध्दे यांनी घटना स्थळी धाव घेतली.