पेट्रोल पंपावर इंधनासह हवा, पाणी २४ तास उपलब्ध करा

पुरवठा विभागाचे पेट्रोल पंपचालकांना आदेश

रत्नागिरी:- शाळांना आता सुट्ट्या पडत असल्याने या दरम्यान कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक हंगाम सुरू होतो. या हंगामात कोकणात येणाऱ्या पर्यटकांची पेट्रोल, डिझेल, सीएनजीऐवजी गैरसोय होऊ नये यासाठी त्याचा पुरेसा साठा ठेवून त्याचा नियमित पुरवठा करावा. सर्व पंपावर हवा, पाणी, स्वच्छतागृहे (२४ तास सुरू ठेवावी) इत्यादी सुविधा मोफत व सहज उपलब्ध होतील याचीही दक्षता चालकांनी घ्यावी, असे आदेश जिल्हा पुरवठा विभागाने सर्व पेट्रोल पंपचालकांना काढले आहेत.

पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी महत्वाचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पर्यटन हंगाम सुरू होत असल्याने व सणासुदीचा काळ असल्याने या कालावधीत पर्यटक मोठ्या प्रमाणात चारचाकी तसेच इतर वाहनाने कोकणात येतात. त्यामुळे पेट्रोल, डिझेल व सीएनजी मागणीत मोठी वाढ होणार आहे. तरी पेट्रोलपंपावर पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजीचा पुरेसा साठा ठेवण्यात यावा व त्याचा नियमित पुरवठा करण्यात यावा. जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपचालकांना त्यांच्या पेट्रोलपंपात पेट्रोल व डिझेलचा बफर स्टॉक ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात. सणासुदीच्या कालावधीत इंधनटंचाई भासू नये यासाठी आपले स्तरावरून सर्व पेट्रोल, डिझेल, सीएनजी पंपचालकांच्या संपर्कात राहून वेळोवेळी माहिती घेऊन उचित कार्यवाही करावी, असे जिल्हा पुरवठा विभागाच्या आदेशात म्हटले आहे.

बहुतांशी पर्यटक कुटुंबासह प्रवास करत असल्याने विशेषतः महिलावर्गासाठी योग्य व सुरक्षित स्वच्छतागृहे 24 तास उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी. इंधन पुरवठा करताना शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने, रुग्णवाहिका यांना प्राधान्य देण्यात यावे, असे जिल्हा पुरवठा विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यातील 17 पेट्रोल पंपचालकांना त्या देण्यात आल्या आहेत.