पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात शिवसेनेचे आंदोलन

रत्नागिरी:- पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलिंडरची भरमसाठ दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात रत्नागिरीत शिवसेनेने जोरदार आंदोलन केले. प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय हे आंदोलन छेडण्यात आले. जिल्हा परिषद गट मिरजोळे व नाचणे येथील शिवसैनिकांनी शुक्रवारी रत्नागिरी रेल्वे स्थानक फाट्यावर आंदोलन करत निषेध केला.  
   

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुका प्रमुख बंड्या साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद चे बांधकाम सभापती बाबुशेठ म्हाप व नाचणे जि.प.गट सदस्य पकाश रसाळ यांनी केले होते. या आंदोलनात मिरजोळे, शिळ, खेडशी, कारवांचीवाडी, कुवारबाव, नाचणे, काजरघाटी, परिसरातील शिवसैनिक व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.   

रेल्वेस्थानक फाटा येथील मुख्य रस्त्यांवर हे आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांबरोबरच सामान्य नागरिकही सहभागी झाले होते. यावेळी मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल-डिझेलची दरवाढ करणाऱया मोदी सरकारचा धिक्कार असो, पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ मागे घ्या, अशी घोषणाबजी करण्यात आली.  पेट्रोल डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे निषेध व्यक्त करण्यात आला. दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झालेले आहे. वारंवार सामान्य नागरिकांवर मोदी सरकार दरवाढ करून अतिरिक्त बोजा टाकत असल्याने शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. अशी प्रतिक्रिया उपजिल्हाप्रमुख तथा जि.प.बांधकाम व आरोग्य सभापती महेश उर्प बाबू म्हाप यांनी दिली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह सर्व गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोल डिझेल व गॅसवरील अन्याय दरवाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी असे म्हणणे आहे.