पूर्वजांचा इतिहास न वाचणारा विश्वाच्या संघर्षात वाचणार नाही: संभाजी भिडे

रत्नागिरी:- हिंदुस्तान हा जगातील सर्वात संपन्न देश आहे. सर्वात मोठी नदी, सुपीक जमीन, कस्तुरी देणारे हरण, सर्वात उंच पर्वत हे सर्व आपल्या हिंदुस्थानात आहे. तिन्ही ऋतू केवळ् हिंदुस्थानातच आहेत. जगात सर्वात जास्त आक्रमणे केवळ हिंदुस्थानावर झाली. पण हिंदुस्थानामध्ये कधीही सुडाची भावना नव्हती. ज्यांनी ज्यांनी आक्रमणे केली, त्यांनी येथीलच सैन्य वापरले होते, ही वस्तुस्थिती आहे. जो देश, जो समाज, आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही, तो विश्वाच्या संघर्षात वाचणार नाही असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी केले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रत्नागिरी शाखेने आयोजित केलेल्या प्रवचनात संभाजी भिडे गुरुजी बोलत होते. त्यांनी आपल्या प्रवचनात हिंदुस्थानावर यापूर्वी झालेल्या आक्रमणांचा इतिहास उपस्थित श्रोत्यांसमोर मांडला. आक्रमण करणारे ब्रिटिश, इंग्रज कशा पद्धतीने भारतात आले. त्यांनी इथे वास्तव्य केले, व्यापार केला. येथील जागा विकत घेतल्या आणि त्यानंतर सत्तेमध्ये सहभागी झाले आणि देश काबीज केला. यासाठी त्यांनी जे सैन्य वापरले ते सैन्य सुद्धा महाराष्ट्रातून घेतले गेले हा इतिहास प्रत्येक भारतीयाला माहित असणे आवश्यक आहे असेही भिडे गुरुजी यांनी सांगितले.

संस्कृत भाषा जगातील अनेक भाषांचे उगमस्थान आहे. अनेक भाषा संस्कृत भाषेतूनच निर्माण झाल्या आहेत. जगाने मान्य केलेल्या २४६ भाषा आहेत परंतु यांची निर्मिती संस्कृत मधूनच झालेली असल्याचा दावा भिडे गुरुजी यांनी केला. जगात बारा महानद्या आहेत. त्यातील सात महानद्या केवळ आपल्या भारतात आहेत. या नद्यांमुळेच आपला हिंदुस्तान सुजलाम सुफलाम व सुपीक आहे. हिंदुस्थानाची वैशिष्ट्य अनेक आहेत, की जी इतर देशांमध्ये नाहीत. जगातील अनेक देशांमध्ये हरणे आहेत. परंतु कस्तुरी देणारी हरणाची जात केवळ हिंदुस्थानामध्ये आहे. ज्या हिंदुस्थानामध्ये सर्व प्रकारचे धातू सापडतात, उंच पर्वत आहेत, कसदार जमीन आहे या सर्व गोष्टींचा आपल्याला अभिमान असणे गरजेचे असल्याचे भिडे गुरुजी यांनी सांगितले.