रत्नागिरी:- तालुक्यातील पूर्णगड येथे एका दुर्दैवी घटनेत आंब्याच्या बागेत सुकलेला पालापाचोळा जाळत असताना मधमाश्यांच्या हल्ल्यात ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. रविंद्र दत्ताराम साळवी ( ६० वर्षे, राहणार मु.पो.कोळंबे, खालचा वठार, ता. जि. रत्नागिरी) असे दुर्घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र साळवी हे त्यांच्या आंब्याच्या बागेत ०५ मे रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास सुकलेला पालापाचोळा जाळत होते. यावेळी आगीच्या धुरामुळे आंब्याच्या झाडावरील संतप्त झालेल्या मधमाश्यांनी रविंद्र साळवी यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना अंगावर चावा घेतला.
या घटनेची माहिती सोबत काम करणाऱ्या कामगारांनी तातडीने रविंद्र साळवी यांचे भाऊ यांना फोनवरून दिली. त्यानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेल्या त्यांच्या भावाने रविंद्र यांच्या अंगावरील मधमाश्या प्लॅस्टिकच्या पिशवीने बाजूला केल्या आणि त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना १३ मे रोजी संध्याकाळी ७.०८ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रविंद्र साळवी यांना मृत घोषित केले.या दुर्दैवी घटनेमुळे कोळंबे परिसरात शोककळा पसरली आहे.









