पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक करणार दौरा

5 ऑक्टोबरला खेड, चिपळूणला पाहणी करणार 

रत्नागिरी:- जिल्ह्यात जुलैमध्ये आलेल्या महापुरात खेड, चिपळूणमधील नागरिक मोठ्याप्रमाणात आपत्तीग्रस्त झाले होते. राज्य शासनाकडून व्यापारी व नागरिकांना आता मदतीचा हात सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक दि. 5 ऑक्टोबर रोजी पाहणीसाठी खेड, चिपळूणमध्ये येणार आहे. अडीच महिन्यानंतर हे पथक येत असल्याने केंद्राचे वरातीमागून घोडे असल्याच्या भावना आपत्तीग्रस्तांमध्ये व्यक्त होत आहेत.

जिल्ह्यात दि. 21 व 22 जुलैला आलेल्या महापुरात चिपळूण व खेडमध्ये मोठे नुकसान झाले होते. त्यातही चिपळूण शहर, आजूबाजूच्या गावांना फटका बसला होता. यात 11जणांचा मृत्यूही झाला होता. चिपळूण, लगतचे खेर्डी व खेड बाजारपेठेचे कोट्यवधी रुपयांचे  नुकसान झाले होते. अनेक घरांना याचा फटका बसला होता. कोट्यवधीच्या नुकसानीपायी राज्य शासनाकडून 46 कोटी रुपयांची मदत रत्नागिरी जिल्ह्याला जाहीर करण्यात आली होती. या मदतीचे वाटप सध्या सुुरु आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्र्यांनी चिपळूण, खेडला भेट देऊन नागरिकांना धीर दिला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही चिपळूणमध्ये येऊन नागरिकांना दिलासा देत केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.आपत्ती उलटून आता अडीच महिने होत आले आहेत. नागरिक व व्यापारीही कोट्यवधीचे नुकसान सोसून आता व्यवसायात पुन्हा जम बसवू पहात आहेत. विमा कंपन्यांकडून विमा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाचे पथक आता खेड व चिपळूणची पाहणी करणार आहे. यामध्ये अर्थ, मत्स्य, कृषीसह विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश आहे. या अधिकार्‍यांच्या अहवालानंतर आपत्तीग्रस्तांच्या पदरी काय पडते याकडे लक्ष लागून राहणार आहे.