पुण्यातील आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या अविराज गावडेची चमकदार कामगिरी

रत्नागिरी:- पुणे येथील आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या अविराजने गावडे याने एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट लोणी या महाविद्यालयाविरुद्ध सामन्यात दोन षटकात एकही रन न देता नऊ विकेट घेत नव्या विक्रमाला गवसणी घातली. वयाच्या पाचव्या वर्षांपासून क्रिकेटचे धडे गिरवणार्‍या अविराजने महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्‍वात अल्पावधीतच यशस्वी कामगिरी केली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 16 वर्षांखालिल लीग स्पर्धेत सुमारे 81 बळी मिळवून त्याने रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. यापूर्वी हे रेकॉर्ड 56 बळींचे होते. अविराजने ते पार करत नवनवे विक्रम स्थापित केले आहेत. या व्यतिरिक्त विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये ऑलराऊडर कामगिरी करत अविराजने सार्‍यांची मने जिंकून घेतली. क्रिकेटमध्ये त्याने केलेल्या कामगिरीची दखल घेण्यात आली असून, त्याची अंडर वर्षांखालिल गटात भारताच्या पश्चिम विभाग क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली होती. सध्या पुणे येथे आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. अविराज गावडे हा राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज लांडेवाडी, भोसरी पुणे या महाविद्यालयाच्या संघातून खेळत आहे.

या स्पर्धेतील एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालया विरुद्ध झालेल्या सामन्यात अविराजने दोन षटकांत एकही धाव न देता नऊ बळी घेण्याची कामगिरी नोंदवली आहे. ही कामगिरी करत अविराजने स्वतःचा विक्रम मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तत्पुर्वी आयआयटी हिंजवाडी महाविद्यालय विरुद्ध सामन्यातही अविराजने दोन षटकांत चार धावा देत 7 बळी घेतले होते. या कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.