पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज

रत्नागिरी:- मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होत असतानाच सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टी भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 

नैर्ऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधून सुरू झाल्याचे भारतीय हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले. मात्र, कोकणातील परतीच्या पावसाचा प्रवास ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने आणखीन आठवडाभर पावसाची हजेरी लागणार आहे. आठवडाभरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस या कालावधीत पडण्याची शक्यता आहे.  

मोसमी पावसाने 29 मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर कोकणात दाखल होण्यास मोसमी पावसाला दहा दिवसांचा कालावधी लागला होता. मोसमी पावसाच्या प्रवासात कमी दाबाच्या पट्ट्यांचा सर्वाधिक लाभ मिळाल्याने कोकणात परतीच्या पावसाचा प्रवास लांबण्याची शक्यता आहे. 

कोकणातील सर्वच जिल्ह्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. कोकणात यंदा सरासरीपेक्षा केवळ 20 ते 30 टक्के पाऊस अतिरिक्त झाला आहे. जिल्ह्यात पावसाने साडेतीन हजार मि. मी. ची सरासरी पूर्ण केली असून, 32 हजाराची एकूण मजल मारली आहे. गतवर्षीच्या तुलनेने मात्र  यावर्षी पाऊस सहाशे मि.मी.पेक्षा कमीच झाला आहे.