व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ना. सामंत आपला नियोजित दौरा सोडून बाजारपेठेत
रत्नागिरी:- तौत्के चक्रीवादळामुळे तालुक्यातील किनार्याला मोठा तडाखा बसला आहे. घरांचे नुकसान झाल्याने बांधकाम साहित्यांची दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आल्याचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी स्पष्ट केले. मात्र लेखी आदेश नसल्याने पोलिसांनी ही दुकाने उघडण्यास मज्जाव केला. यावरून बाजारपेठेत काहीसा वाद झाला. मंत्री उदय सामंत यांना हे समजतात त्यांनी नियोजित दौरा सोडून बाजारपेठेत दाखल झाले. बांधकाम साहित्याची दुकाने पुढील 8 दिवस सकाळी 9 ते 1 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढण्याच्या सूचना दिल्या.
रविवारपासून जिल्ह्याला तोक्ते चक्रीवादळाने झोडपून काढले. शहरी आणि ग्रामीण भागात देखील अनेक घरांचे नुकसान झाले. त्यामुळे घर दुरुस्तीसाठी आवश्यक सामान नागरिकांना मिळावे या हेतूने रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी फक्त बांधकाम साहित्याची दुकाने उघडण्याची परवानगी दिली. मात्र वादळ परिस्थितीतील नुकसानीचे पंचनामे इत्यादी कामे चालू असल्याने त्यांनी तातडीने जनतेला कळावे यासाठी त्यांनी आपल्या व्हाट्स स्टेटस वर तसा मेसेज ठेवला. मात्र आज सकाळी लेखी आदेश नसल्याचे कारण देत पोलिसांनी ही दुकाने उघडण्यास व्यापाऱ्यांना मज्जाव केला. ही घटना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कळताच त्यांनी आपला नियोजित दौरा सोडून व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी रत्नागिरी बाजारपेठेत धाव घेतली. वादळ परिस्थिती मुळे जनतेला घर दुरुस्तीसाठी व बांधकामासाठी साहित्य मिळणे आवश्यक आहे त्यामुळे बांधकाम साहित्याची दुकाने पुढील आठ दिवस सकाळी 9 ते 1 चालू ठेवण्याबाबत आदेश काढण्याच्या सूचना ना. उदय सामंत यांनी प्रशासनाला दिल्या असून तसे आदेश काढण्यात येणार आहेत. नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कॅबिनेट मिनिस्टर आपला नियोजित दौरा सोडून बाजारपेठेत येतो याबद्दल व्यापारी संघटनेच्या वतीने ना. उदय सामंत यांना धन्यवाद देण्यात आले.