रत्नागिरी:- नैसर्गिक बदलते वातावरण, कीडरोग यामुळे आंबा बागायतदारांची अवस्था दिवसेंदिवस कठीण होत आहे. शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी राज्याने याकडे गांभिर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शेतकर्यांच्या हितासाठी पीकविमा भरपाईचे निकषही बदलण्याची मागणी कोकणातील बागायतदारांकडून होत आहे.
कीडरोग आणि वातावरणातील बदलाचा आंबा पिकाला फटका बसत आहे. फवारणी करण्यात येणारी किटकनाशके प्रभावहीन ठरत आहेत. त्यामुळे फुलकिडीला (थ्रीप्स्) आळा बसत नाही असे चित्र आहे. याबाबत आवश्यक संशोधन होण्याची आवश्यकता आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळातील शेतकर्यांपर्यंत पोचतच नाहीत. शासन पातळीवर आंबा पीक आणि त्यातील अडचणी याबाबत सविस्तर चर्चा होण्याची गरज आहे.
प्रभावहीन ठरलेल्या किटकनाशकांच्या बिलाची रक्कम बागायतदारांकडून घेतली जाऊ नये, असे आवाहन होऊनही अद्यापपर्यंत याबाबत सकारात्मक हालचाली झालेल्या दिसत नाहीत. रोखीने औषधे खरेदी केलेल्या बागायतदारांची रक्कमही परत मिळालेली नाही. त्यामुळे बागायतदारांसमोर अडचण वाढली आहे. त्यासाठी शासन पातळीवर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा बागायतदारांनी व्यक्त केली.