पीएमश्री अंतर्गत जिल्ह्यातील 13 शाळांना मान्यता; विद्यार्थ्यांसह शिक्षक होणार ‘स्मार्ट’

रत्नागिरी:- केंद्र शासनाच्या तज्ज्ञ समितीने पीएमश्री (पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया) योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील 516 शाळांना मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून या शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास करण्यात येणार आहे. याअंतर्गत कोकणात 46 तर रत्नागिरी जिल्ह्यात 13 शाळांना मान्यता देण्यात आली आहे.

पीएमश्री योजनेसाठीचे निकष पूर्ण करणाऱ्या, शासन अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या राज्यातील 426 प्राथमिक आणि 90 माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आली आहे. या शाळांची पारदर्शकपणे निवड करण्यासाठी पोर्टलवर शाळांनी स्वत: अर्ज करून विविध तीन आव्हानांचे टप्पे पार करणे आवश्यक होते. त्यानुसार प्राथमिक आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांनी ऑनलाईन अर्ज केले. या टप्प्यांमध्ये पात्र ठरण्यासाठी शहरी भागांसाठी 70 टक्के तर ग्रामीण भागांसाठी 60 टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. हे टप्पे पार करणाऱ्या शाळांची तज्ज्ञांच्या समितीने निवड केली आहे.
केंद्र सरकारने दि.7 सप्टेंबर 2022 रोजी केंद्र फुरस्कृत पीएमश्री योजनेला मान्यता दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि विशिष्ट कालावधीत आदर्श शाळा विकसित करणे तसेच निष्पक्षता, प्रवेश, गुणवत्ता आणि समावेश या पातळ्‌‍यांवर सर्वसमावेशक, समापत समग्र परिवर्तन घडविण्याचा या योजनेचा उद्देश आहे. याअनुषंगाने देशभरात एकूण 14,500 शाळा निर्माण करण्यात येणार आहेत. ही योजना पाच वर्षांसाठी राबविली जाणार असून याअंतर्गत निवड झ्ाालेल्या सध्याच्या शाळा आदर्श शाळांमध्ये रूपांतरित होणार आहेत.
या योजनेतील करारानुसार निवड झ्ाालेल्या शाळांसाठी 60 टक्के निधी केंद्र शासनाकडून मिळणार असून राज्य शासनाचा हिस्सा 40 टक्के असणार आहे. यासाठी राज्य शासन प्रती शाळा पाच वर्षांसाठी 1.88 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार आहे.

येत्या आाथक वर्षात राज्य शासनाने पीएमश्री योजनेच्या राज्याच्या हिस्स्यापोटी 91 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 2022-23 मध्ये आदर्श शाळांसाठी 479 कोटींची तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी 254 कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत. पुढील वर्षी मोठ्या बांधकामांसाठी प्राथमिक शाळांसाठी 199.40 कोटी तर माध्यमिकसाठी 56.12 कोटी इतका निधी ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे समग्र शिक्षा अंतर्गत पायाभूत सुविधांसाठी 86 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या वर्षात 1351 आयसीटी लॅब, 2040 डिजिटल लायब्ररी, 10,594 स्मार्ट क्लासरूम, शिक्षकांसाठी 97,249 टॅब, 105 स्टेम लॅब, 533 टिंकरिंग लॅब तयार करण्यात येणार आहेत.