पावसाळ्यातील भूस्खलनाच्या घटना रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

रत्नागिरी:- गतवर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने पूर व भूस्खलन याचा मोठा तडाखा कोकणला व प्रामुख्याने चिपळूण, खेड, राजापूर व संगमेश्वर तालुक्यांना बसला होता. याचा अभ्यास करून भूवैज्ञानिकांनी काही सूचना केल्या आहेत. तसेच, उपाय सुचविले आहेत.

प्रामुख्याने पावसाळ्यातील धोका टाळण्यासाठी १५ गावांत बांबू लागवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, धोकादायक स्थितीच्या पार्श्वभूमीवर १९ ठिकाणी निवारा केंद्रेही उभारावी लागणार आहेत. २२ जुलैच्या अतिवृष्टीत चिपळूण व परिसराला महापूराने विळखा घातला. २४ तासांत होत्याचे नव्हते झाले. कोट्यावधीच्या मालमत्तेची हानी झाली. यातून नुकसानग्रस्त कुटुंबे सावरली असली तरी पुराची धास्ती मात्र मनातून गेलेली नाही. दरम्यान अतिवृष्टीच्या कालावधीत प्रामुख्याने पेढे कुंभारवाडीसह पूर्व विभागातील दसपटी विभागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. त्यामुळे डोंगरच्या डोंगर खाली कोसळण्याची भीती होती. ही वस्ती भयग्रस्त होती. याबाबत तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण पथकाने २०१५-१६ व २०१६-१७ आणि ऑगस्ट, सप्टेंबर २०२१ असे सर्व्हेक्षण केले होते. त्यानुसार २०१५-१६ व १६-१७ च्या अहवालानुसार गोवळकोट येथील ३० घरांचे पुनर्वसन कापसाळ येथील शासकीय जागेत करावयाचे निश्चित करण्यात आले. मात्र त्यास गती मिळालेली नाही.

१९ ठिकाणी निवारा केंद्रे

तालुक्यातील दसपटी विभागातील तिवरे, ओवळी, नांदीवसे, कोळकेवाडी आदी १९ ठिकाणी पावसाळ्याच्या कालावधीत आपत्तीचा धोका आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर निवारा केंद्रे उभारण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतीला करण्यात आल्या आहेत. प्राथमिक शाळा, हायस्कूल, अथवा बंद घरांमध्ये ताप्तुरते निवारा केंद्र उभारले जाणार आहे.

१५ गावांत डोंगर उतारावर बांबू लागवड

तालुक्यातील तिवरे, रिक्टोली, ओवळी, पेढे, नांदिवसे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. याठिकाणी वारंवार दरडी कोसळू नयेत. यासाठी १५ गावांत तीव्र डोंगर उतारावर बांबू ची लागवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बांबूची लागवड केल्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. १५ गावांतील या जागा बहुतांश खासगी असल्याने सामाजिक वनीकरण विभाग आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बांबू लागवड करण्याचे नियोजन आहे.

३५ ठिकाणी डोंगरावर संरक्षक भिंती

अतिवृष्टीच्या कालावधीत दसपटी विभागात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. येत्या पावसाळ्यात पुन्हा येथे आपत्तीचा संभव आहे. त्यानुसार भूवैज्ञानिकांनी ३५ ठिकाणांच्या डोंगर उतारावर संरक्षक भिंत, नाल्याचे खोलीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाला याबाबतचे अंदाजपत्रक तयार करण्यास सांगण्यात आले. याशिवाय, पेढे येथील परशुराम घाटात वरील बाजूसही उपाययोजना राबविण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिल्या आहेत.

३१ घरांचे पुनर्वसन करावे लागणार

दसपटी विभागातील ११ ग्रामपंचायत हद्दीतील ३७ ठिकाणचे सर्वेक्षण केले होते. याबाबत दुसऱ्या अहवालानुसार चार ग्रामपंचायत हद्दीतील ३१ घरांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे लागणार आहे. येथे पुन्हा लोकवस्ती आपत्तीत सापडण्यापासून वाचण्यासाठी ३१ घरांसाठी अलोरे येथील कोयना प्रकल्पाची जागा प्रशासनाकडून निश्चित केली आहे.

दोन शाळांचे पुनर्वसन

अतिवृष्टीत तिवडी व कोळकेवाडी येथील जिल्हा परिषद शाळांनाही फटका बसला आहे. आगामी काळातही या शाळांना धोका असल्याने तिवडी राळेवाडी व कोळकेवाडी माच धनगरवाडी या जिल्हा परिषद शाळा स्थलांतरित करण्याच्या सूचना भूवैज्ञानिकांनी दिल्या आहेत. त्यानुसार चिपळूण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना या दोन्ही शाळा स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या आहेत.