रत्नागिरी:- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम असून, पुढील काही दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. मागील चौवीस तासात जिल्ह्यात 872.51मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर काहीप्रमाणात ओसरल्याचे चित्र असले तरी मागील चौवीस तासात तीन लाखाहून अधिकचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात मागील चौवीस तासात मंडणगड 157 मिमी, खेड 77.85 मिमी, दापोली 141.71मिमी, चिपळूण 81.11 मिमी, गुहागर 123 मिमी, संगमेश्वर 52.50 मिमी, रत्नागिरी 98.77 मिमी, लांजा 67.20 मिमी, राजापूर 73.37 मिमी पावसाची नोंद असून जिल्ह्यात 872.51 मिमी पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात या पावसात गुहागरमध्ये कोंडकारुळ गावात दिशूद आजगोलकर यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले, मयुरी रोहीलकर यांच्या घराचे छत कोसळून नुकसान झाले. रामाणेवाडी येथील सार्वजनिक विहीरीचा बांध कोसळून 35 हजाराचे नुकसान, परचुरीत तर्फे खुर्द बौध्दवाडी येथे भिंत कोसळून 25 हजाराचे नुकसान, पांगारी तर्फे हवेली येथे हफीजा दळवी यांचा गोठा कोसळून 31 हजाराचे नुकसान, संगमेश्वर तालुक्यात तिवरे तर्फे देवळे येथे घरावर फणसाचे झाड कोसळून 30 हजाराचे नुकसान झाले. रत्नागिरी तालुक्यातील शीळ येथे रुक्मीणी कदम यांच्या घराचे 60 हजार, तरवळ येथील दीपक धामणे यांच्या दुकानात शॉर्टसर्कीमुळे आग लागून नुकसान झाले. दापोली तालुक्यातील निगडे येथील जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळून नुकसान तर स्मृती हुबणे यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून 1 लाख 33 हजाराचे नुकसान झाले. राजापूर तालुक्यातील नाणार येथे सुभाष खानविलकर यांच्या घरावर झाड कोसळून 12 हजार, पन्हळे तर्फे राजापूर येथे विजय गुरव यांच्या घरकुलातून बांधल्या जाणार्या घराची भिंत कोसळून 30 हजाराचे नुकसान झाले. जैतापूर आगरवाडी येथे रोहन शिवलकर यांच्या घराचे दहा हजाराचे नुकसान झाले. मिठगवाणे येथे संतोष लिंगायत यांच्या घरावर झाड कोसळून दहा हजार, दांडेवाडी येथे इंद्रायणी मयेकर यांच्या घरावर झाड कोसळून नऊ हजार तर सोलगाव येथे अनुसया परवडी यांच्या घरकुल मधून बांधलेल्या घरावर आंबा झाड कोसळून दहा हजाराचे नुकसान झाले. जिल्ह्यात जवळपास तीन लाखाहून अधिकचे नुकसान चौवीस तासात झाले असून याची नोंद नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.