पावसाची उघडीप; जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात

रत्नागिरी:- मागील चार दिवस जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने शुक्रवारी पूर्ण दिवस उघडीप दिली. पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. रत्नागिरीतील काजली नदीचा पूर ओसरला. याशिवाय वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, मुचकुंदी, बावनदी या नद्यांचा पूर देखील ओसरला होता. राजापूर मधील कोदवली आणि खेड मधील जगबुडी नदी इशारा पातळी बाहेर होत्या.

जिल्हाभरात मागील चार दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मुसळधार पावसाने खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडून वाहत होती. यामुळे खेड शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. याशिवाय राजापूर मधील कोदवली नदीला देखील पूर आल्याने राजापुरात पूरस्थिती निर्माण झाली होती. सतत कोसळणाऱ्या पावसाने तालुक्यातील काजळी नदीला पूर आला. यामुळे हरचेरी येथील बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले होते. तब्बल दहा ते बारा तासानी काजळी नदीचा पूर ओसरला. मात्र या पुराने हरचेरी बाजारपेठेतील दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत जगबुडी आणि कोदवली या दोन नद्या शुक्रवारी सायंकाळी इशारा पातळी बाहेर वाहत होत्या. इतर नद्यांची पूरस्थिती नियंत्रणात आली होती. दरम्यान मागील २४ तासात ७०१ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. लांजा तालुक्यातील सर्वाधिक ११४ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. मंडणगड तालक्यात ८२.६० मिमी, दापोली ६७.३०, खेड ६५.३०, गुहागर ५८.२०, चिपळूण ६८.६०, संगमेश्वर ९७.२०, रत्नागिरी ९०.१० आणि राजापूर तालुक्यात ५६.९० मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याला १ ऑगस्ट पर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र शुक्रवारी पूर्ण दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली आहे.