पावसाची उघडीप; कातळावरील लावण्या संकटात

रत्नागिरी:- मोसमी पावसाची सुरवात उशिरा झाल्यामुळे भात लावण्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. आठ दिवस समाधानकारक पाऊस पडल्यांतर दोन दिवस उघडिप दिल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील कातळावरील लावण्यांच्या कामात व्यत्यय आला आहे. मात्र पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी भात लावण्यांची काम सुरु आहेत.

तालुक्यात 6 हजार 833 हेक्टर एकुण क्षेत्र असून आतापर्यंत 530 हेक्टरवर लावण्या झाल्या आहेत.
रत्नागिरी तालुक्यात मागील आठ दिवसात समाधानकारक पाऊस झाला; मात्र मंगळवारी (ता. 11) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात पाऊसच पडलेला नाही. 1 जुनपासून आतापर्यंत 798 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सलग पडलेल्या पावसामुळे पेरण्या शंभर टक्के झाल्या असून पहिल्या टप्प्यात पेरणी केलेल्या शेतकर्‍यांनी लावणीची कामे सुरु केली आहेत. रविवारपासून तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला. दुपारी कडकडीत उनही पडत आहे. आधीच मोसमी पाऊस लांबल्यामुळे पेरण्या उशिराने झाल्या असून भात लावण्यांचे वेळापत्रक पुढे सरकले आहे. जुन महिन्यात सुरुवातीला पेरण्या केलेल्या शेतकर्‍यांना रोपांचा तुटवडा जाणवत आहे. पुरेशी रुजवात न झाल्यामुळे मिरजोळेसह अनेक गावातील शेतकर्‍यांच्या लावण्या रखडल्या. उपलब्ध भात रोपांवरच काही शेतकर्‍यांनी लावण्या आटपून घेतल्या आहेत. जुलैचा पहिला आठवडा पूर्ण झाला तरीही लावण्यांच्या कामाला वेग आलेला नाही. आतापर्यंत दहा ते पंधरा टक्केच लावण्या झालेल्या आहेत.
तालुक्यात तालुक्यात एकुण खरीपाचे क्षेत्र 6 हजार 833 हेक्टर असून आतापर्यंत 530 हेक्टरवर भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत. तालुक्यातील 60 टक्के क्षेत्र हळवे बियाण्यांचे आहे तर उर्वरित 40 टक्के मध्ये 20 टक्के निमगरवे आणि 20 टक्के गरवे बियाण्यांचे आहे. सुरुवातीच्या टप्प्यात वीस टक्के पेरण्यांमधून उगवलेल्या रोपांच्या लावण्या सुरु झाल्या आहेत. दोन दिवस पाऊस थांबल्यामुळे कातळावरील लावण्यांना ब्रेक लागला आहे. पाणथळासह पाणी उपलब्ध असलेल्या जागांवरील लावण्या करण्यामध्ये शेतकरी गुंतला आहे. तसेच बहूसंख्य शेतकर्‍यांनी उशिराने पेरण्या केल्यामुळे त्यांना लावण्यांसाठी अजुन पंधरा दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.