पावसाचा प्रत्येक थेंब वाचवा; जलशक्ती अभियान जनचळवळ झाली पाहिजे: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे.  हे केवळ अभियान न राहता ती एक जनचळवळ बनली पाहिजे.  या भूमिकेतून यंत्रणानी काम करावे तसेच यात जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग मिळवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी केले.

जलशक्ती अभियान संदर्भात आढावा बैठकीत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पाडली.  यावेळी या अभियानात करण्यात येणाऱ्या कामांच्या आराखड्यावर चर्चा झाली. 

या अभियानात जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्था तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असावा यासाठीही नियोजन करा असे जिल्हाधिकारी म्हणाले. 

अभियानात रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलसाठ्यांचे पुनर्भरण, गावासाठी नव्याने पाणवठे बनविणे, कचरा साठून खराब झालेल्या पाणवठ्यांचे पुनरुज्जीवन तसेच पाणथळ जागांची सफाई आणि वृक्षारोपण आदी कामांचा समावेश राहणार आहे. 

ग्रामपंचातींनी उपजिल्हाधिकारी मनरेगा यांच्यासाठी गावासाठी गावतलाव बनविण्याचे प्रस्ताव पाठवावेत या प्रस्तावांना मंजूरी देण्यात येईल असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, ग्रामपंचायतीनी आपल्या इमारतींच्या छतावर पाणी साठविण्यासाठी यंत्रणा उभारावी तसेच पहिल्या टप्प्यात प्रत्येक गावात किमान दहा घरांच्या रेनवॉटर हार्वेस्टिंग साठी नियोजन करुन नागरिकांच्या सहाय्याने अधिकाधिक पाणी जमिनीत मुरेल यासाठी प्रयत्न करावेत.  

नगरपालिका क्षेत्रात देखील नगरपालिकांनी नव्या इमारतीत आरंभीच रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत काळजी घ्यावी व सध्या असणाऱ्या इमारती आणि घरांवरही अशी यंत्रणा उभारण्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन करावे.  

जंगल पाण्याचा रखवालदार असे म्हटले जाते यामुळे जिल्ह्यात वनक्षेत्र वाढीसाठी वनीकरण वाढेल याकडेही लक्ष द्यावे.  शाळा महाविद्यालयांमधून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकाला झाडे दत्तक द्यावीत असे ते म्हणाले. 

महिला बचतगटाच्या माध्यमातून फळबाग, काजू, आंबा, मसाले तसेच बांबूची लागवड करता येईल याबाबत बचत गटांना वित्तसहाय देणे शक्य आहे.  यातून वनीकरण वाढण्यासोबतच महिलांना उत्पन्नाचे साधनही उपलब्ध होईल अशा बाबतचे प्रस्ताव मागवून त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना डॉ. पाटील यांनी यावेळी दिल्या.