वार्ताहर:-पाली पाथरट गावांमधील बाजारपेठेसह सर्व व्यावसायिक आस्थापनेसह 15 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामकृतीदल व पाली गावाच्यावतीने घेण्यात आला आहे. पाली परिसरात सध्या कोरोनाचे पाॅझिटिव्ह रुग्ण संख्या वाढल्याने व गत दोन दिवसांमध्ये कोरोनाने तीन जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाली बाजारपेठ ही तालुक्यातील एक मोठी मध्यवर्ती बाजारपेठ असल्याने गेल्या काही दिवसांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठया प्रमाणावर गर्दी वाढलेली होती. त्यातुनच कोरोना संसर्गाचा धोका मोठया प्रमाणात वाढून बाधितांची संख्या वाढलेली असून त्यातच गेल्या दोन दिवसात तीन जणांचे मृत्यू झाल्याने पाली गावात सर्वत्र घबराट पसरलेली आहे. त्यामुळे गावाची आरोग्यविषयक सुरक्षा यांच्यासाठी आज तातडीने ग्रामकृतीदल, ग्रा.पं., देवस्थान गावप्रमुख मानकरी, वाडीप्रमुख, व्यापारी प्रतिनिधी यांची बैठक होऊन गावासाठी 15 मे पर्यंत सर्व किराणा, दुध, भाजी व फळे, वृत्तपत्रे विक्री दुकाने पुर्णत: बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. यामधून औषधे दुकानांना ठराविक वेळेतच सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली.
पाली बंदच्या बैठकीसाठी ग्रामकृतीदल अध्यक्ष व सरपंच विठ्ठल सावंत, श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचे अध्यक्ष संतोष सावंतदेसाई, पाली बाजारपेठ व्यापारी संघटना अध्यक्ष विश्वास सावंत, पाथरट गावप्रमुख अनिल धाडवे, विभागप्रमुख सचिन सावंत, उपसरपंच संतोष धाडवे, माजी सरपंच रामभाऊ गराटे, संदीप गराटे, प्रदीप घडशी, दिनेश सावंतदेसाई, दिनेश धाडवे, शैलेश काटकर, सुंदर हिरवे उपस्थित होते. तसेच यामधून अत्यावश्यक सेवेची कोणाला तातडीची आवश्यकता असल्यास त्यांनी ग्रामकृतीदलाशी संपर्क साधण्याचे व त्याला वस्तु उपलब्धतेसाठी प्रयत्न केले जातील असं सांगण्यात आले आहे. विनाकारण फिरणा-यांविरुद्ध कारवाई व ॲन्टीजेन तपासणी करण्यात येणार आहे.