रत्नागिरी:- तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाली आठवडा बाजार सुरु करण्याचा निर्णय पाली ग्रुप ग्रामपंचायत ग्राम कृतीदलाने घेतला आहे. येत्या बुधवारपासून (ता. 9) बाजाराला सुरुवात होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेले नऊ महिने हा बाजार बंद ठेवण्यात आला होता. पालीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या मागणीनुसार आठवडा बाजार सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाली ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तीन तालुक्यांचा मध्यवर्ती व दोन राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध पालीचा बुधवारचा आठवडाबाजार शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाबाबत सर्व नियमांचे पालन करून पुर्ववत सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षिततेसाठी बाजारपेठेत ठिकठिकाणी सॅनिटाइझरची व्यवस्था आणि मार्गदर्शक सूचना फलक लावण्यात येणार आहेत. मास्क न घालता फिरणार्यांविरोधात 100 रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजारात येणार्या सर्व नागरिकांना शासन निर्देशाप्रमाणे कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाने जाहीर केलेल्या उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीला प्रशासक विजय सोलगावकर, ग्रामविकास अधिकारी आशिष खोचडे, माजी सरपंच नितीन देसाई, संदीप गराटे, प्रदीप घडशी, रामभाऊ गराटे, माजी उपसरपंच मंगेश पांचाळ, तंटामुक्ती अध्यक्ष विवेक सावंत, विठ्ठल सावंत, सुरेश सावंत, रमेश तेंडूलकर, सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.