पालीतील प्रदीप धाडवेच्या अपघाती मृत्यूने कुटुंबाचा आधार हरपला

रत्नागिरी:- मुंबई – गोवा महामार्गावरील पाली पाथरट उभी धोंड येथे शनिवार 14 जानेवारी रोजी रात्री प्रदीप प्रभाकर धाडवे (30, पाथरट, पाली) या तरुणाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूने धाडवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कमावत्या मुलावर काळाने घाला घातल्याने कुटुंबाचा आधारच हरपला आहे. 

प्रदीप याची घरची परिस्थितीत अतिशय बिकट आहे. त्याने आपले शिक्षण मामाकडे खानू येथे राहून कसेबसे पूर्ण केले. त्यानंतर त्याने घरची जबाबदारी अंगावर घेतली. सध्या तो नोकरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.  तुटपुंज्या नोकरीवर त्याला घरीतील व्यक्तींना सांभाळावे लागत होते. त्यातच त्याचे आई – वडिल वृध्द असल्याने आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्याही आजारपणाचा खर्च त्याला करावा लागत होता. छोटा भाउ असल्याने त्यालाही तो आर्थिक मदत करत होता. त्याच्यामुळे घरचा पश्न काहीअंशी सुटला होता. मात्र काल अचानक झालेल्या प्रदिपच्या मृत्यूने आई वडिलाना धक्का बसला आहे. ज्या वयात मुलाने आधार द्यावा त्या वयात मुलाचा मृतदेह त्यांना पहण्याच दुर्दैव त्यांच्यासमोर आलं होत. मुलाच्या मृत्यूचा धसका सहन न झाल्याने आई वडील अंथरुणाला खिळलले आहेत. 

प्रदीप हा मनमिळावू असल्याने खानू, पाली, पाथरट परिसरात त्याचा मोठा मित्रपरिवार आहे. खड्डयांमुळे त्याचा मृत्यू झाला असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गचे अधिकाऱ्यानी साधी विचारपूसही त्याच्या कुटुंबाची केली नाही. यामुळे पाली, पाथरटवासिय आक्रमक झाले आहेत. खराब रस्त्यामुळेच प्रदीपचा बळी गेल्याचे बोलले जात आहे. प्रदीपच्या मृत्यूस सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदाराला जबाबदार धरण्यात यावे असा आक्रमक पवित्रा घेत येथील ग्रामस्थ महामार्गावर आंदोलन पुकारणार आहेत. महामार्गावरील ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे धाडवे कुटुंबाला त्यांचा मुलगा गमवावा लागला. त्यांचा रोजीरोटीचा पश्न महामार्ग विभाग सोडवणार का असा सवाल उपस्थित होत आहे.