मा.जिल्हाधिकारी यांचे सुधारित आदेश
रत्नागिरी:- शिमगोत्सवासाठी मंदिर विश्वस्त व पालखीधारक यांना कोरोनाची चाचणी करणे आवश्यक नसल्याचा सुधारित आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला आहे. पालखी सोबत असणाऱ्या मर्यादित स्थानिक लोकांनी कोव्हिड 19 चे प्राथमिक नियम पाळावेत. या लोकांनी आरोग्य यंत्रणेकडून तापमापीने शरीराचे तापमान मोजणे व शरीरातील ऑक्सिजनची मर्यादा (एसपीओ 2) ची तपासणी आवश्यक राहील. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यानी कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक राहील असा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडील 10 मार्च 2021 अन्वये रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा उत्सव-होळी उत्सव यासाठी आदेश निर्गमित केले होते. सदर आदेशामध्ये सर्व मंदिर विश्वस्त व पालखीधारक यांनी लगतच्या आरोग्य यंत्रणेकडून आरटीपीसीआर/रॅपिड अँटीजेन चाचणी करुन घ्यावी असे नमूद करण्यात आले होते. आता 22 मार्च 2021 च्या सुधारित आदेशानुसार या सूचनेमध्ये बदल करण्यात आला आहे.
पालखीसोबत असणाऱ्या मर्यादित स्थानिक लोकांनी कोव्हीड 19 चे प्राथमिक नियम पाळणे आवश्यक आहे व आरोग्य यंत्रणेकडून तापमापीने शरीराचे तापमान मोजणे व शरीरातील ऑक्सिजनची मर्यादा (एसपीओ 2) ची तपासणी आवश्यक राहील. जिल्ह्याच्या बाहेरुन आलेल्या नागरिकांनी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वी आरटीपीसीआर/रॅपिड अँटीजेन चाचणी करुन घेणे बंधनकारक राहील असे सुधारित आदेशात नमूद करण्यात आले आहे.