पालकमंत्री परब यांची ती प्रॉपर्टी बेनामी: किरीट सोमय्या 

रत्नागिरी:-मुरुड येथील वादग्रस्त रिसॉर्टप्रकरणी पालकमंत्री अनिल परब यांनी ४२ गुंठे शेतजमिन विकत घेतली. त्याबाबतच्या शपथपत्रात खाडाखोड करण्यात आली आहे. तेथे सध्या असलेल्या रस्त्याबाबत गोंधळ आहे. तो खासगी की सरकारी याचा उलगडा होत नाही. मिळकतीच्या एका बाजूला समुद्र व मध्ये रस्ता असे अधिकाऱ्यांनी खाडाखोड करून लिहिले आहे. रिसॉर्टच्या बांधकामाबाबत आपल्याला कल्पना नाही, असे मूळ जमिनमालक म्हणतो आहे. तसेच परब यांच्या मिळकतीत या प्रॉपर्टीचा उल्लेख नाही. त्यामुळे ती बेनामी प्रॉपर्टी आहे, अशा आरोपांच्या फैरी माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी आज येथे पत्रकार परिषदेत झाडल्या.

सोमय्या म्हणाले, मुरुड, दापोली येथील जमीन मूळ मालकाने शेतजमीन म्हणून विकली होती. त्यानंतर व्यवहार संपला. परंतु मूळ मालकाच्या बनावट सह्या करून शपथपत्रामध्ये बिनशेती आणि त्यावर रिसॉर्ट आधीच होते, असे दाखवत सरकारी दस्तावेजामध्ये खेळ केला. यामुळे मुख्यमंत्र्यांनी परबांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. सोमय्या यांनी केल्याने पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत यामुळे आणखी वाढ झाली आहे.
सोमय्या म्हणाले, परब यांनी विभास साठे यांच्याकडून ४२ गुंठे शेतजमिन विकत घेतली. याच्या पश्चिम दिशेला समुद्र आहे. परंतु गावचे ग्रामसेवक, तलाठी, सर्कल अधिकारी, शपथपत्रात खाडाखोड केली. पश्चिम दिशेला समुद्र आहे व मध्ये रस्ता आहे, असे अधिकाऱ्यांनी स्वहस्ताक्षरात लिहिले आहे. त्यामुळे अशी खाडाखोड केल्याने फौजदारी गुन्हा दाखल करावा.

अनिल परब यांनी १९ जून २०१९ ला खरेदीखत रजिस्टर केले आणि २६ जून २०१९ रोजी ग्रामपंचायतीला लेटरहेडवर विभास साठे यांचे नावे बांधकाम परवानगी घेतली होती. त्याप्रमाणे बांधकाम झाले आहे. त्याची मोजणी करून घरपट्टी माझ्या नावाने द्यावी, असे पत्र ग्रामपंचायतीला दिले. ग्रामपंचायतीने परब यांच्या नावाने इमारत क्र. १०७४ नंबर दिला व घरपट्टी ४६ हजार ८०६ रुपये वसूल केली. परंतु यावरील बांधकामासंबंधी मला कोणतीही कल्पना नाही, असे साठे यांनी स्पष्ट केले. परब यांच्या या प्रॉपर्टीचा मिळकतीमध्ये उल्लेख नसल्याने ही बेनामी प्रॉपर्टी असून मी इडीच्या दिल्लीतील कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटून तक्रार दिल्याचे सोमय्यानी या वेळी सांगितले.

कायदामंत्री परबांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे. रिसॉर्टमध्ये जायला रस्ता नसल्याने तिथे रस्ता डीपीडीसीमधून बनवण्यात आला. या रस्त्यासाठी ४०० झाडे तोडली गेली. येथे दोन फलक आहेत. एकावर ही खासगी जागा असून रस्त्याचा वापर करू नये, असे लिहिले आहे तर दुसऱ्यावर हा रस्ता डीपीडीसीतून केल्याचा फलक आहे. त्यामुळे या रस्त्याला पैसे कसे दिले? हे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगावे. या प्रकरणी पोलिस व्यवस्थित तपास करत असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालाची वाट पाहत आहेत. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना या प्रकरणी कारवाई करावीच लागणार आहे, असे ठाम मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेला माजी खासदार नीलेश राणे, उत्तर रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू उपस्थित होते.

मुंबई महापालिकेचा ग्लोबल व्हॅक्सिन घोटाळा दोन दिवसांत उघड करू. त्याची अधिक कागदपत्रे आणि त्यात कोणाचा हात आहे, हे उघडकीस आणू, असा इशारा सोमय्या यांनी या वेळी दिला. जानेवारी २०२० मध्ये कर्नाळा बॅंकेचा ८०० कोटींचा घोटाळा झाला. त्यात आमदार विवेक पाटील यांच्याविरोधात सहकार खात्याने नोटीस पाठवली. पण मुख्यमंत्री ठाकरे यांनी गेल्या १८ महिन्यांत पाटीलांवर कारवाई केली नाही. आता शेतकऱ्यांचे पैसे बुडाल्याने ईडीने कारवाई केली, असेही सोमय्या म्हणाले.