पानवल धरणात आढळला बेपत्ता तरुणीचा मृतदेह

रत्नागिरी:- तालुक्यातील पानवल धरण येथे बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मालती गजेंद्र कळंबटे (३३, रा. झरेवारी रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालती ही ३० सप्टेंबर रोजी राहत्या घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली होती. याप्रकरणी तिच्या नातेवाईकांकडून पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. सोमवारपासून नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांकडून मालती हिचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. सर्व प्रयत्नांनतरही मालती हिचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता.

मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मालती हिचा मृतदेह पानवल धरणाच्या पाण्यात तरंगत असल्याचे स्थानिकांना दिसून आले. त्यानुसार या घटनेची खबर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांचे पथक पानवल धरण येथे दाखल होत घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा केला.