रत्नागिरी:- नैसर्गिक उताराने (ग्रॅव्हिटी) शहराला पाणी पुरवणारे पानवल धरणे रत्नागिरीकरांची जादा पाण्याची तहान भागविण्यास सज्ज होणार आहे. ६० वर्षामध्ये एकदाही दुरूस्तीचा विचार न झालेल्या पानवल धरणाच्या दुरूस्तीला पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळे 20 कोटीचा निधी मिळाला आहे. या धरणाचे मजबुतीकरण आणि गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुमारे 50 टक्केच्यावर काम झाले असून पावसाळ्यापूर्वी ते पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे धरणाची पाणी पाणीसाठ्याची क्षमता ०.३४१ दलघमी इतकी होणार आहे.
उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन हे धरणाच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रत्नागिरी औद्योगिक क्षेत्र स्मार्ट सिटी अंतर्गत २०.६९ कोटीचा निधी पानवल धरणाच्या दुरूस्तीसाठी मंजूर झाला. हे काम रत्नागिरी पाटबंधारे विभागमार्फत करणेत येत आहे. त्यासाठी निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीद्वारे हे काम सुरू झाले आहे. शहराला पालिकेच्या मालकीचे पानवल धरण व
जलसंपदा विभागाचे शीळ धरण या दोन धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. पानवल धरणाचे बांधकाम १९६२ मध्ये झाले आहे. धरणास ६२ वर्षे पूर्ण झाल्याने ते पुर्णतः मोडकळीस आलेले आहे. पानवल धरण हे दगडी बांधकामातील असून धरणातून गुरुत्वीय बळाने रत्नागिरी शहरास पाणी पुरवठा केला जातो. धरणाची दुरुस्ती करण्याबाबत २००८ पासून मंत्री उदय सामंत प्रयत्न करत होते.
धरण दगडी बांधकामातील असल्याने धरणास मोठ्या प्रमाणात गळती होत होती. त्यामुळे सांडव्याचे व पक्षभिंतीचे दगड निखळून पडलेले आहेत. या धरणाची दुरुस्ती करण्यासाठी दगडी सांडव्यास सिमेंट ग्राऊटींग करणे, दोन्ही बाजुस संधानकात अस्तरीकरण करणे, स्टीलिंग बेसीनची नव्याने उभारणी करणे, विमोचकाकडे जाणेकरीता पोहोच रस्ता करणे आदी कामांचा समावेश करणेत आलेला आहे. रत्नागिरी औद्योगिक क्षेत्र- स्मार्ट सिटी अंतर्गत या कामासाठी २०.६९ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झालेनंतर पूर्ण क्षमतेने धरणाचा पाणीसाठा ०.३४१ दलघमी इतका होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. रत्नागिरी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पानवल धरणाची दुरुस्ती होऊन जादा पाण्याची गरज भागविण्यास मदत होणार आहे.