रत्नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव बाजारपेठ रस्त्यावर दुचाकी निष्काळजीपणे चालवून पादचारी महिलेला ठोकर दिली. या अपघात प्रकरणी स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश गंगाराम नागले (४५, रा. नागलेवाडी, चरवेली, रत्नागिरी) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना २६ डिसेंबर २०२४ सकाळी साडेनऊच्या सुमारास कुवारबाव बाजारपेठ येथील रस्त्यावर घडली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित महेश नागले हे हातखंबाहून रत्नागिरीकडे येत असताना कुवारबाव येथे रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिला लिलवती अनंत करवडे (७०, रा. तळेकांटे, ता. संगमेश्वर) हिला ठोकर दिली. या अपघातात त्या जखमी झाल्या. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल महेंद्र खापरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.