शिवसेना ठाकरे गटाचा रनपवर मोर्चा
रत्नागिरी:- दीड महिना आधी जर शीळवरील नवीन जॅकवेल झाले होते, तर तुम्ही त्यातून पाणी पुरवठा का सुरू केला नाही. नियोजनशुन्य कारभारामुळे शहरावर पाणी संकट आहे. जो पाणी पुरवठा होतो त्यामध्येही पक्षीय राजकारण केले जात आहे. आम्हाला सुद्धा आग लावायला वेळ लागणार नाही. याद राखा पाण्यात पक्षपातीपणा केली, तर पालिकेला टाळे ठोकु. आजच्या आज १६ प्रभागात १६ टॅंकर सुरू करा. तसे झाले नाही, तर काय करू, हे वेळच ठरवेल, असा सज्जड दम ठाकरे शिवसेनेने पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी आणि पाणी अभियंत्यांना भरला.
शहरातील पाणी प्रश्न गंभीर असून अनेक भागात चार-चार दिवस पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून ठाकरे शिवसेनेने पालिकेवर आज मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.
परंतु ठाकरे सेनेचा मोर्चा दिसलाच नाही. काही ठराविक पदाधिकारी थेट वाहनांवरून पालिकेत धडकले. तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, महिला पदाधिकारी आदींनी याचे नेतृत्व केले. पालिकेत आल्या आल्या मुख्याधिकारी तुषार बाबर दालनात नसल्याने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुख्याधिकारी हाय… हाय…, मुख्याधिकाऱ्यांचा निषेध असो, अशा घोषणा दिल्या. एवढ्या मुख्याधिकारी आल्यानंतर सर्व त्यांच्या दालनात गेले. यावेळी पाणी अभियंता अविनाश भोईर व अन्य कर्मचाऱी सोबत आले. पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
त्यानंतर ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांवर प्रश्नाचा भडिमार केला. शहरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. यावर पालिकेने काय नियोजन केले. ठेकेदाराने यात दिरंगाई केली असेल तर त्यांच्यावर फैजदारी दाखल करा. परंतु जनतेला पाण्यापासून वंचित ठेऊ नका.पाण्याच्या नियोजनासाठी इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली. आम्हाला का नाही बोलावले. आम्ही दहा अस वा १०० आमची ताकद होती आणि कायम रहाणार. नागरिक पाणी-पाणी करत आहेत. आजपासून प्रत्येक प्रभागात १ अशा १६ टॅंकरचे नियोजन करा. त्याची पुर्ण माहिती शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांना द्या. यावर मुख्याधिकारी श्री. बाबर म्हणाले, ठिक आहे, आम्ही तसे नियोजन करून तुम्हाला माहिती देतो. जर तसे झाले नाही, तर पालिकाला कुलुप ठोकु. या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका, असा इशाराही यावेळी शिवसेनेने दिला.