रत्नागिरी:- तौक्ते वादळानंतर आता रत्नागिरी शहरवासीयांना वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहरात पाणीयोजनेची पाइपलाइन टाकण्यासाठी सर्वत्र खोदकाम करण्यात आले आहे. पुन्हा त्या चरी बुजविण्यात आल्या; मात्र रस्ता समपातळीत करण्यात आले नाहीत. त्यावरील माती पावसाने रस्त्यावर आल्याने शहरात चिखलाचे साम्रज्य पसरले आहे. त्या चरींमध्ये वाहने अडकून वाहनधारकांचे नुकसान होत आहे. शहरातील पोस्ट ऑफिससह अनेक ठिकाणी ही गंभीर परिस्थिती आहे. रिक्षा व्यावसायिक व वाहनधारक बेजबाबदारपणामुळे ओढवलेल्या या मानवनिर्मित संकटाला तोंड देऊन मेटाकुटीला आले आहेत.
रत्नागिरी किनारपट्टीला रविवारी आणि सोमवारी तौक्ते वादळाचा जोरदार फटका बसला. यामध्ये पडझड झाली. झाडे, फांद्या घरांवर पडून मोठी हानी झाली. महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले. प्रशासनासह सर्व यंत्रणा यातून सावरण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यातून रत्नागिरी तालुका आणि शहर सावरत असताना आता नवे संकट शहरवासीयांसमोर आले आहे.
शहरामध्ये सुधारित पाणी योजनेचे काम सुरू आहे. वरच्या भागातील काम पूर्ण झाले असून आता मुख्य बाजारपेठेसह खालच्या भागात पाणीयोजनेची नवीन पाइपलाइन टाकण्यात आली. संचारबंदीचा फायदा घेऊन पालिकेने मुख्य बाजारपेठेसह ठिकठिकाणी जेसीबीने चर खोदले. त्यानंतर पाइपलाइन टाकून ते बुजविण्यात आले. मात्र चर बुजविण्याचे काम तेवढ्या दर्जाचे झालेले नाही, हे पावसात उघड झाले आहे. तौक्ते वादळामुळे कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले. पावसामुळे बुजविण्यात आलेल्या चरांवरील माती रस्त्यावर येऊन शहरात सर्वत्र चिखल झाला .शहरवासीयांना रस्त्यावरून चालणे जीकीरीचे झाले आहे. वाहनधारकांना तर कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी चरीमध्ये चाक रुतून वाहने अडकली आहेत. आता पोस्ट ऑफिस येथे रिक्षा स्टॉपला लागून चर खोदल्याने तेथील दोन ते तीन रिक्षा या चरीमध्ये अडकून त्यांचे नुकसान झाले.