जिल्ह्यात अशी प्रथमच वेळ; पुन्हा पेरण्या करण्याची तयारी
रत्नागिरी:- पाऊस लांबल्यामुळे अनेक शेतकर्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. भातरोपांसाठी केलेल्या धूळ पेरण्यांना पाऊस न मिळाल्यामुळे शेतकर्यांची पंचाईत झाली आहे. अनेक ठिकाणी रोपंच रूजून आलेली नाहीत. त्यामुळे पुन्हा पेरण्या करण्याची वेळ शेतकर्यांवर येणार आहे. काही शेतकर्यांनी रोपवाटिका जगवण्यासाठी पंपाद्धारे पाणी देण्यास सुरवातही केली आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा पाऊस यंदा महिना संपत आला तरीही सुरू झालेला नाही. त्याचे परिणाम जिल्ह्यातील भातशेतीवर दिसू लागले आहेत. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर संगमेश्वर, राजापूर या दोन तालुक्यात धूळपेरण्या केल्या जातात. 1 जूनपासून पूर्व मोसमी पाऊस पडल्यामुळे पेरण्या केलेल्या रोपांना आपसुकच पाणी मिळते. यंदा पूर्व मोसमी पाऊसच न झाल्यामुळे धूळपेरण्या केलेल्या शेतकर्यांची पंचाईत झाली आहे. राजापूर, संगमेश्वरमधील शेतकर्यांनी 2 जूननंतर पेरण्या केल्या होत्या. 20 दिवस झाले तरीही पाणी न मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी रोपेंच रूजून आलेली नाहीत. त्यामुळे शेतकर्यांनी पुन्हा पेरण्या करण्यासाठी पावले उचलली आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील सुमारे 20 ते 25 शेतकर्यांनी पेरलेली रोपे रूजूनच आलेली नाहीत. त्यातील काही शेतकर्यांनी पुन्हा पेरण्या करण्यासाठी पावले उचलली आहेत. पहिल्या बियाण्यांचा खर्च वाया जाणार आहे. येथील शेतकरी सुहास लिंगायत यांनी पंपाद्वारे पाणी दिले आहे. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे, नाचणे येथील शेतकर्यांनीही याच पद्धतीने पाणी दिले आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सर्वसाधारपणे 30 टक्के पेरण्या झाल्या. त्यातील बर्याचशा शेतकर्यांच्या शेतामधील रोपांची रूजवात झालेली नाही. जिथे जमिनीत ओलावा आहे तिथे रोपं रूजून आलेली आहेत. उर्वरित ठिकाणी जमीन जशीच्या तशी आहे. काही शेतकर्यांनी पावसाच्या शक्यतेने पेरणीपूर्वीची मशागतीची कामेही सुरू केली; पण त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. मृग नक्षत्रासह जून महिनाही संपत आला तरी नियमित पावसाचा पत्ता नसल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पाऊस कधी पडणार याची वाट पाहत आहे. अजून पेरण्याच झालेल्या नसल्यामुळे खरिप हंगामाचे वेळापत्रकच बदलणार आहे. या हवामानाचा विचार करून शेतकर्यांनी पावले उचलावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.









