रत्नागिरी:-पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव हा सरपंचांनी ठेवला असता भाजपने केलेली दरवाढ ही अंगलट आल्याने याचं खापर दुसर्याच्या माथी मारण्याचा खटाटोप सुरु झाला आहे. उपोषणाला बसणार्यांनी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारा विरोधात उपोषणाला बसावे असा सल्ला देखीला माजी सरपंच- विद्यमान सदस्य सचिन उर्फ बबूल कोतवडेकर यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
कुवारबाव ग्रामपंचायतीत सध्या तिघाडी निर्माण झाली आहे. शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी ग्राम विकास आघाडी अस्तित्वात आली. सरपंच पद भाजपकडे गेल्यानंतर काही काळानंतर या आघाडी बिघाडी निर्माण झाली. आघाडीतील ४ सदस्य आघाडीला रामराम करुन बाजूला गेले आणि आता बाजूला गेलेल्या सदस्यांना चुकीच्या पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कुवारबाव ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन उर्फ बबलू कोतवडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा केला.
पाणीपट्टी दरवाढीचा जो प्रस्ताव सादर झाला तो प्रस्तावच मुळात अध्यक्षांनी ठेवला होता. त्यामुळे अध्यक्षांच्या नावाने इतिवृत्तात नोंद होणे गरजेचे होते, मात्र तसे न होता या प्रस्तावाला सूचक म्हणून आपले नाव देण्यात आले तर अनुमोदक म्हणून स्नेहल वैशंपायन यांचे नाव देण्यात आले. हे खोटं असून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचे कोतवडेकर यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी कुवारबांव ग्रामपंचायतीची १० लाख रु. पाणीपट्टी थकीत होती. दोन वर्षांत थकीत पाणीपट्टी २६ लाखांवर जाऊन पोहोचली आहे, असे सांगून नळपाणी योजना टिकण्यासाठी सरपंचांनी ठेवलेला प्रस्ताव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. मात्र भाजपने केलेली दरवाढ दुसर्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हा ठराव संमत झाल्यानंतर काहींनी आपण या ठरावाला विरोध केल्याचे पत्र दिले. मात्र ते मिटींगला हजर नव्हते, त्यांनी विरोध कसा काय केला असा सवाल करत उपोषणाची भाषा करण्यासाठी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार विरोधात उपोषणाला बसावे. ‘दूध का दूध – पानी का पानी’ होऊन जाईल असा सल्ला देखील कोतवडेकर यांनी यावेळी दिला.