रत्नागिरी:- तिवरे (ता. चिपळूण) धरण फुटल्यानंतर पाटबंधारे विभाग धरणांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने अधिक सतर्क झाला आहे. धरणांना लागलेली गळती, पडझड आदी महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 8 कोटीचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने शासनाला सादर केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील 13 धरणांचा समावेश आहे. मात्र सिंचनाबाबतची उदासीनता कायम आहे. फक्त 1 टक्के एवढे सिंचन क्षेत्र आहे.
तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या घटनेने जिल्ह्यातील सर्व धरणांच्या सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात अजूूनही 8 धरणे धोकादायक आहे. त्यामुळे यंदाच्या पावसामध्ये या धरणामध्ये पाण्याचा साठा करण्यात आला नाही. पाटबंधारे विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये जिल्ह्यातील 13 धरणांची दुरूस्ती महत्वाची आहे.
त्यासाठी या विभागाने सुमारे 8 कोटीचा प्रस्ताव तयार केला आहे. प्रस्तावामध्ये नातुवाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी, पिंपळवाडी 25 लाख, घोळवली 1 कोटी, मालघर 25 लाख, गुहागर 35 लाख, शिपोशी 25 लाख, तळवडे 1 कोटी, पंचनदी 15 लाख, पंधेरी 25 लाख, बेणी 50 लाख, पन्हाळे 1 कोटी, तेलीवाडी 50 लाख या धरणांचा यामध्ये समावेश आहे. सुरक्षेच्यादृष्टीने या धरणांची दुरूस्ती अत्यावश्यक असल्याने त्याचा प्रस्ताव शासनाच्या जलसंपदा विभागाला सादर करण्यात आला आहे. धरणांची गळती बंद करणे, पडझड थांबविणे आदीचा यामध्ये समावेश आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठा आहे. मात्र समुहशेती किंवा दुबार पिक घेण्याच्यादृष्टीने अपेक्षित प्रतिसात मिळत नाही. काही तालुक्यामध्ये हे सुरू आहे. मात्र एकुणच पाणी साठ्याचा आणि सिंचन क्षेत्राचा विचार करता फक्त 1 टक्केच सिंचन क्षेत्र आहे.









