पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत अर्थव जागडे, अजिंक्य मेटकरी राज्यात चौथा

रत्नागिरी:- पाचवी शिष्यवृत्तीची गुणवत्ता यादी बुधवारी (ता. 4) जाहीर झाली. यामध्ये ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव (ता. खेड) चा अर्थव सतीश जागडे आणि जिल्हा परिषद शाळा कोकरे नं. 4 चा अजिंक्य हरी मेटकरी या दोघांनी 97.31 टक्के गुण मिळवत राज्यात चौथा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक येण्याचा मान पटकावला.

जिल्हा परिषद पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेची गुणवत्ता यादीमध्ये राष्ट्रीय ग्रामीणमध्ये दहा, सर्वसाधारण ग्रामीणमधून 162, शहरी सर्वसाधारणमधून 118 जणांची यादी जाहीर झाली आहे. पाचवीच्या परिक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण यादीत जिल्हा परिषद शाळा ओणीचा लोकेश विलास सौंदळकरने 96.64 टक्के मिळवत पाचव क्रमांक मिळवला आहे. मयुरेश वाडेकर या उमरे नं. 1 च्या विद्यार्थ्यांने 95.97 टक्के मिळवत सहावा तर ज्ञानदिपच्या अर्णव मगदुमने 95.30 टक्के मिळवून सातवा क्रमांक पटकावला. पाचवीमध्ये शहरी विभागात पटवर्धन प्रशालेच्या मधुरा संजय पाटीलने सातवा तर आदित्य धमालेने आठवा क्रमांक मिळवला.
दरम्यान, ज्ञानदिप विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका पुर्वा मोरे म्हणाल्या की अर्थव मुळातःच अभ्यासू आहे. शिष्यवृत्ती परिक्षेत यश मिळवण्यासाठी शाळेकडून रात्र अभ्यासीका, वर्षातून शंभर वेळा प्रश्‍न पत्रिका सोडवून घेण यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.