पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात अडचणी 

रत्नागिरी:-पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याबाबत शासनाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत; मात्र नववी ते बारावीच्या वर्गांना शहरी भागातील शाळांमधून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे तिच अडचण पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात खासगी आणि जिल्हा परिषदेच्या मिळून सुमारे बाराशे शाळा आहेत. त्यात 80 हजाराहून अधिक मुले शिक्षण घेत आहेत.

यंदाच्या शैक्षणिक सत्रावर अजुनही कोरोनाचे सावट आहे. पहिल्या टप्प्यात सुरु केलेल्या नववी ते बारावीच्या वर्गांतील प्रत्यक्ष शिकवणीला रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागातून प्रतिसाद मिळाला आहे; मात्र शहरी भागांमधील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यल्पच आहे. माध्यमिक शाळांमधील 83 हजार विद्यार्थ्यांपैकी 46 हजार विद्यार्थीच प्रत्यक्ष वर्गात हजर राहत आहेत. उर्वरितांसाठी ऑनलाईन वर्ग घेण्यात येत आहेत. शाळेत विद्यार्थी येण्याचे प्रमाण जैसे थेच राहणार आहे. या परिस्थिती शासनाकडून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यासाठी नियोजन केले जात आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस वर्ग सुरु होतील अशी शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बाराशेहून अधिक शाळा आहेत. त्यात जिल्हापरिषदेच्या शाळांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. ऑनलाईन शिकवणी घेताना ग्रामीण भागात अनेक अडचणी येत असल्यामुळे अभ्यासक्रम व्यवस्थित शिकवता येत नाही. या परिस्थितीत बहूतांश पालकवर्गही वर्ग सुरु करण्याच्या बाजूने येत आहे. पण शहरी भागात अजूनही कोरोनाची भिती कायम असल्याने नववी ते बारावीप्रमाणेच पाचवी ते आठवीच्या शाळांचा प्रतिसाद कमी राहण्याची शक्यता आहे.